ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळू नका



कोरोना (CORONA) काळात रुग्णांसाठी काम करून घेऊन राज्य सरकारने आम्हाला फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे आता बेमुदत संपातून माघार नाही, असा संताप राज्यभरातील आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जवळपास ७० हजार आशांनी राज्यव्यापी संप पुकारला असून, याचे गंभीर परिणाम ग्रामीण भागातील कोरोनाच्या कामावर होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे. 

कोरोनाच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या जीवशी न खेळता सरकारने त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे.

सरकार हात वर का करत आहे

आशा सेविकांच्या कामाचे कौतुक करत मुख्यमंत्री एकीकडे आशा कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतात. मात्र केलेल्या कामाचा मोबदला देण्याची वेळ आली की सरकार हात वर करत आहे. राज्य सरकारकडून मागण्या मान्य करण्याची आश्वासने अनेकदा मिळाली आहेत. मात्र ही आश्वासने न पाळून सरकार आशा सेविकांची फसवणूक करत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांशी चर्चाही झाली. मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही माधव भांडारी यांनी केला आहे.