धनंजय मुंडें - कोरोना काळात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातही कोरोनाची स्थिती बिकट बनली आहे. अशावेळी कोरोना काळात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो, अशी खंत स्वत: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  दैनिक कार्यारंभ बीड



मुंडेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं

प्रशासन म्हणून काळजी घेतली नाही. जनतेनं तर अजिबात काळजी घेतली नाही, परिस्थिती गंभीर होईल याचा अंदाज मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला होता. पण काळजी न घेतल्यानं परिस्थिती बिकट बनली असल्याचं मुंडे यावेळी म्हणाले. आता मात्र झटकून कामाला लागा असा आदेश तर धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. जिल्ह्यात 2 हजार 500 ऑक्सिजन बेड तयार आहेत. नव्याने 1 हजार बेड तयार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.


रुग्णांसाठी बेड कमी पडले तर खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, अशावेळी लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचंही मुंडे म्हणालेत. जिल्ह्यात 9 जणांचा अंत्यविधी एकाच सरणावर झाला, उद्या 25 जणांचा अंत्यविधी एकाच सरणावर करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त करताना लॉकडाऊन ही गरज बनल्याचं मुंडे यावेळी म्हणाले.


अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

7 एप्रिल रोजी अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ नगर पालिकेवर आली होती. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत.


बीडमधील कोरोना स्थिती –

बीड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहायची झाली तर आज दिवसभरात 703 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32 हजार 340 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 28 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 709 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.