भाजपच्या मुरजी पटेलांचा निवडणूक अर्ज भरण्याचा कार्यक्रम अचानक रद्द

भाजपच्या मुरजी पटेलांचा निवडणूक अर्ज भरण्याचा कार्यक्रम अचानक रद्द


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी सुरुवातीला भाजपच्या मुरजी पटेल यांचे नाव आघाडीवर होते. मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचारही सुरु केला होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाकडून (Eknath Shinde Camp) अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत निश्चित मानल्या जाणाऱ्या मुरजी पटेल (Murji Patel) यांच्या उमेदवारीबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरजी पटेल हे अंधेरी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यासाठी मुरजी पटेल गुरुवारी उमेदवारी अर्ज भरायला जाणार होते.

मुरजी पटेलांची भूमिका काय?

मुरजी पटेल यांनी बुधवारी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मी उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाईन, असे सांगितले होते. काल मुंबई भाजपची एक महत्त्वाची बैठकही संपन्न झाली. या बैठकीला मुरजी पटेलही हजर होते. या बैठकीनंतरच मुरजी पटेलांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पक्षाचा आदेश आला तर निवडणुकीतून माघार घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.निवडणूक लढवण्याची सूचना आली तर लढणार, नाहीतर पक्षादेश असेल माघार घेणार. शेवटी मी पक्षादेश पाळणारा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यावर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील, असेही मुरजी पटेल यांनी म्हटले होते.