ठाकरे गटाच्या बाजूने फिरणार? हायकोर्टाच्या निर्णयाने शिवसेनेला आणखी एक भावनिक बुस्टर

ठाकरे गटाच्या बाजूने फिरणार?  हायकोर्टाच्या निर्णयाने शिवसेनेला आणखी एक भावनिक बुस्टर


शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा या दोन प्रकरणांवरुन झालेल्या राजकीय संघर्षात मुंबई महानगरपालिका सपशेल तोंडावर आपटली आहे. परंतु, हीच बाब ठाकरे गटासाठी एकप्रकारची इष्टापत्ती ठरली आहे. यापूर्वी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेने शिवसेनेला परवानगी नाकारली होती. परंतु, न्यायालयाने पालिकेचा हा निर्णय फिरवत उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला होता. हा न्यायालयीन विजय ठाकरे गटासाठी एक मोठा भावनिक बुस्टर ठरला होता. या लहानशा विजयानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते आणि त्यांनी या संधीचं अक्षरश: सोनं केलं होतं. शिंदे गटाच्या आडकाठीमुळे दसरा मेळावा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चालत आलेली अनेक वर्षांची परंपरा खंडित होणार की काय, असे मोठे संकट उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले होते. परंतु, उच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने आल्यानंतर ठाकरे गटाने या संकटाचं रुपांतर संधीत केले होते.