उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं सुरू होतं



मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या आठ दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून राज यांच्याकडून पक्षसंघटनेचा आढावा घेतला जात आहे. मात्र काल राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली. शहरातील प्रस्थापितांविरोधात संघर्ष करा, असा कानमंत्र राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे मनसे-भाजपच्या संभाव्य युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच मनसे आणि शिवसेनेतही एकत्र येण्याबाबत खलबतं केली जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या सर्व चर्चांवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चांगलं काम केलं होतं. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जायला हवं, अशी मागणी कोणीतरी माझ्याकडे केली असल्याची बातमी एका वृत्तपत्रात आली आहे. मात्र या बातमीत काहीही तथ्य नाही,' असा खुलासा राज ठाकरेंनी केला आहे.

जावयासाठी गुजराती समाजाला आरक्षण दिले; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी

मनसेची कार्यकारिणी बरखास्त

'नागपूर शहरातील मनसेची सर्व कार्यकारिणी बरखास्त करत आहे. घटस्थापनेवेळी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करणार आहे. काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. पक्षस्थापनेच्या १६ वर्षानंतरही नागपूर शहरात मला पक्ष अपेक्षित असलेल्या स्थितीत उभा राहिलेला दिसत नाही. अनेक तरुण इच्छुक आहेत. त्यांना संधी दिली जाईल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दौरा करून पुन्हा दोन-तीन दिवसांसाठी मी नागपुरात येणार आहे,' अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.


पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह

प्रदीर्घ कालावधीनंतर राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. रविवारी राज यांचं रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यानंतर स्वागतासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रेल्वे स्टेशनपासून राज ठाकरे हे मुक्कामी असलेल्या हॉटेल तुली इम्पेरिअलपर्यंत रॅली काढण्यात आली. रविभवनमधील बैठकीत त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होती. पक्षाची शहरातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना बाहेर पाठवून कार्यकर्त्यांना आत बोलावून चर्चा सुरू करण्यात येत होती.