शरद पवार यांना धमकीचा फोन, पण थांबतील



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज सकाळी धमकीचा फोन आला होता. पवार यांचा आज सोलापूरच्या कुर्डूवाडीत नियोजित दौरा होता. या दौऱ्यावर पवारांनी येऊ नये, अशा आशयाचा कॉल त्यांना आला. फोन करणारी व्यक्ती कोण आहे? त्याने ही धमकी का दिली? याची माहिती सध्या समोर येऊ शकलेली नाही, पोलिस त्याची चौकशी करतायेत. पण शरद पवार यांनी धमकीला भीक न घालता आपला नियोजित कुर्डूवाडी दौरा पूर्ण केला.

माढा तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती तसेच विधानसभेचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं. आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूंकडून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. माढा तालुक्यात बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे यांचं मोठे वर्चस्व आहे. सध्या ते भाजप नेत्यांच्या संपर्कात होते पण ऐनवेळी त्यांनी शरद पवार यांना कार्यक्रमाला बोलाविल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

शरद पवार यांना धमकीचा फोन, पण थांबतील ते पवार कसले

तत्पूर्वी, शरद पवार यांना कुर्डूवाडी दौऱ्यावर येऊ नका, अशा आशयाचा धमकीचा फोन आला होता. आपण कोणत्याही परिस्थितीत दौऱ्यावर जाऊ नका, कुर्डूवाडी दौरा टाळा, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना फोनवर दिली. पण धमकीला भीक घालतील ते पवार कसले. त्यांनी आपला नियोजित दौरा पूर्ण केला. शरद पवार यांना लोकनेते म्हणून ओळखले जाते. कायम लोकांच्या गराड्यात राहणं पवार पसंत करतात. आतापर्यंत अनेक वेळा पवारांना अशा धमक्या आल्या. पण पवारांनी पर्वा न करता किंबहुना धमकीला भीक न घालता आपले नियोजित दौरे पूर्ण केले.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कुर्डूवाडी येथील पंचायत समिती इमारतीच्या आवारात स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर बायपास रोडवरील संकेत मंगल कार्यालयात माढा करमाळ्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आमदार शिंदे बंधू यांनी आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाला शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी मंत्री धनंजय मुंढेदेखील उपस्थित होते.