मेंदूविकार



डॉ.अमोल कासवा मेंदु व मनकाविकार तज्ञ

मेंदूशास्त्र - मज्जासंस्था रोग विज्ञान - न्युरॉलॉजी Brain मेंदूशास्त्र - न्युरॉलॉजी, हे मज्जासंस्था, मेंदू, त्याची रचना आणि त्याला होणारे विकार/व्याधी ह्या विषयावर काम करणारे वैद्यक शास्त्र आहे. मज्जासंस्था, मेंदू आणि मज्जारज्जूबाहेरील चेतापेशी यांचा आपल्या शरिरातील अन्य अवयवांवर सुद्धा ताबा असतो त्यामुळे मेंदूविकाराचा माणसाचे इतर अवयव, माणसाची वागणूक या विविध गोष्टींवरही परिणाम होऊशकतो.

मेंदूचा इतर अवयवांशी सततच संबंध असतो त्यामुळे ब-याचदा मेंदूविकारतज्ञ इतर मेडिकल स्पेशालिस्ट्सच्या बरोबरीने काम करतात. उदाहरणार्थ हाडांचे डॉक्टर, फिझिओथेरपिस्ट इत्यादी.

मेंदूमधे वेगवेगळ्या भागांमधे वेगवेगळ्या स्वरुपाचे कार्य चालते. उदा. पाठीमागील भाग हा दृष्टी ज्ञानाशी तर दोन्ही बाजूचा भाग हा श्रवणाशी संबंधीत आहे. पाठीमागील परंतु वरचा भाग हा संवेदनांशी तर पुढील वरचा भाग हा

कार्यप्रेरकतेशी संबंधित असतात. अगदी पुढील भाग हा विचारांशी तर तळाकडील पुढील भाग हा वासांशी संबंधित असतो. मेंदूच्या तळाचा भाग हा हायपोथैलमस म्हणून ओळखला जातो, व तो अंतस्त्रावी ग्रंथींशी संबंधित असतो. मेंदूतील मानेकडचा भाग ब्रेनस्टेम म्हणून ओळखला जातो. त्यामधे श्वसन हृदय व रक्तवाहिन्यांची कार्य, खोकला, उलटी, शिंक वगैरे प्रतिक्षिप्त क्रीयांशी निगडीत आहे. छोटा मेंदू (सेरेबेलम) तोल सावरणे व कौशल्यपूर्ण हलचालींचे नियंत्रण करणे, यांच्याशी निगडीत आहे. मेंदूतील पूर्ण विकसित व अविकसित अशा भागांच्या मध्ये एक भाग आहे, त्याला लिंबिक सिस्टिम असे म्हणतात. हा भाग नैसर्गिक प्रवृत्ती, भूक, भावना, आनंद, दु:ख, इ. शी संबंधित आहे.