पोरानं पीएचडीचा अभ्यास बाजूला ठेवला अन् सरपंच झाला!

लोकशाहीत ग्रामपंचायतची निवडणूक सर्वात कठीण समजली जाते आणि हीच निवडणूक राजकारणाचा पायाही मानली जाते. मोठ-मोठया राजकीय नेत्यांची कारकीर्द ग्रामपंचायत मधूनच सुरू झालीये. सध्या राजकारण बदलतंय. उच्चशिक्षित तरुणांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा गावाच्या विकासासाठी उपयोग व्हावा यासाठी तरुण संधी शोधत असतात. असाच गावाच्या विकासाची तळमळ असलेला एक तरुण आपलं पीएचडीचं संशोधन बाजूला ठेऊन ग्रामपंचायत निवडणुकीत उतरला. गावकऱ्यांनीही त्याच्या विकासाच्या कल्पनांना साद घालत, भरघोस मतांनी विजयी करुन त्याच्या खांद्यावर सरपंच पदाची जबाबदारी टाकलीये.



नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वाशिम जिल्ह्यातील 'वडजी' ग्रामपंचायतच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी थेट पीएचडी अभ्यासक शत्रुघ्न मधुकर बाजड यांना सरपंच म्हणून निवडलं आहे. शत्रुघ्न हैद्राबाद मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल येथे डॉक्टरेटच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. ते आयुर्वेदिक औषधांच्या विषारीपणाचे मूल्यमापन करण्यासंदर्भात संशोधन करत आहेत.

शत्रुघ्न यांच्या घरात राजकारणाचा कोणताही वारसा नाही. पण पुणे- हैदराबाद सारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेतलेले शत्रुघ्न जेव्हा सुट्टीच्या दिवसात गावी यायचे तेव्हा गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यातूनच त्यांना समाजकार्याची आवड निर्माण झाली. गावातील अन्य तरुणांनी त्यांना यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आग्रह केला. विकास करायचा तर सत्ता हवीच या उद्देशाने त्यांनीही होकार दिला. अन सरपंचपदासाठी अर्ज भरला. सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास कसा करता येईल याचे मॉडेल त्यांनी गावकऱ्यांच्या समोर मांडले. मजबूत रस्ते, स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य ह्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण, उदयोग उभारणीसाठी मदत कशी करता येईल, जास्तीत जास्त निधी मिळवून त्याचे योग्य नियोजन कसे करता येईल हे गावकऱ्यांना समजावून सांगितलं आणि गावकऱ्यांनाही हे पटल्याने त्यांनी शत्रुघ्न यांना विजयी केलंय.

मुलाने उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते. शत्रुघ्न बाजड यांच्या वडिलांचेही तसेच होते. मात्र शिक्षण सोडून मध्येच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यावर आई वडिलांनी सुरवातीला त्यांना विरोध केला मात्र गावाच्या विकासाची त्याची इच्छा बघून त्यांनीही त्याला होकार दिला. आता गावकऱ्यांनी शत्रुघ्नवर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवावा ही अपेक्षा आईवडिलांना आहे. गावकऱ्यांना उच्चशिक्षित सरपंच मिळाल्याने पुढील पाच वर्षात त्याच्या ज्ञानाचा फायदा होऊन गावाचा कायापालट होईल, असा विश्वास गावकऱ्यांना वाटतोय.