संजय राठोड यांच्यावर गोमुत्र शिंपडलं काय?

 सरकार बदलले आणि त्यांच्या शुभचिंतकांना चांगले दिवस आले आहेत. रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग प्रकरण असेच आहे. आमचे सरकार असताना पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने आकाश पाताळ एक केले होते. आज त्याच प्रकरणातील आरोपी संजय राठोड धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ झाले आहेत. त्यांच्यावर काय गोमुत्र शिंपडले का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच दिशा सालियनचा मुद्दा नसतानाही तो उकरुन काढून सत्ताधाऱ्यांनी काल त्याच्यावर रान पेटवलं. मुख्यमंत्र्यांचं NIT प्रकरण बाहेर निघू नये, यासाठी काल सत्ताधाऱ्यांची धडपड सुरु होती, असं अजित पवार म्हणाले.



करोनावरून राजकारण नको!

ज्याप्रकारे करोना चीन, जपान, ब्राझील आदी देशांत वाढतोय. ते पाहता आपण गांभीर्याने घ्यायला हवे. यांसदर्भात कुठलेही राजकारण न करता केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सर्वांनी करायला हवी. मात्र, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज तीन आठवडे चालावे, या आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे अजित पवार म्हणाले.


मुखमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका घेताहेत

विधिमंडळाच्या कामकाज समितीच्या बैठकीत सीमावाद प्रश्नावर ठराव आणण्यात येईल, असे ठरले होते. परंतु, अद्याप राज्य सरकारने हा ठराव मांडलेला नाही. आज अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचा अंतिम दिवस आहे. आजच्याही कामकाजात सीमावाद ठराव नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सातत्याने आक्रमक भूमिका घेत असताना आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेताहेत, हे कळायला मार्ग नाही. सीमालगत असलेल्या गावातील मराठी जनतेला महाराष्ट्र सरकर त्यांच्या पाठीशी उभी आहे, हा विश्वास देण्यात सरकार मागे पडत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

तसे पुरावा असलेली कागदपत्रे मी शोधून काढलीत...!

मुंबई ही सोन्याचे अंडी देणारे शहर आहे, असे छगन भुजबळ बोलल्यावरून सत्तापक्षाने प्रचंड गदारोळ घातला. वास्तविक पाहता हा शब्दप्रयोग यापूर्वी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनीदेखी केला आहे, तसे पुरावा असलेली कागदपत्रे मी शोधून काढली आहेत. सरकार अत्यंत सोयीचे राजकारण करत आहे, असेदेखील पवार म्हणाले.