कोरोना पुन्हा आलाय…
चीनसह जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढलेय.. चीनमध्ये तर मृतांचा खच पडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आतापासून सावध झाले असून, देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी करण्यात आली आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य सरकारने कोरोना रुग्णांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सीक्वेन्सिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुन्हा मास्कसक्ती होणार..?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडवीय यांनी तातडीने हायव्होल्टेज मिटींग घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार राहा. शिवाय देशात पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्वाधिक गर्दी शाळा-कॉलेजमध्ये असते. त्यामुळे इथे जास्त काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय ज्येष्ठांची सातत्याने तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत, त्यांना ताप किंवा सर्दी झाली, तरी ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
जीनोम सीक्वेन्सिंगचा निर्णय..
भारतातही गेल्या 24 तासात कोरोनाचे 112 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय खंदारे म्हणाले, की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, राज्यातील कोरोना रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी मुंबई, पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाच्या या लाटेत चीनमधील 60 ते 70 टक्के जनता कोरोनाच्या विळख्यात सापडेल व त्यात 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने सारे जगच पुन्हा चिंतेत पडले आहे.
टिप्पणी पोस्ट करा