अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बीडमधून आरोपीस घेतले ताब्यात
बीड एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना २० जूनला माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई करत बीड येथून अल्पवयीन मुलगी आणि आरोपीस ताब्यात घेतले आहे. सचिन तोंडे ( रा. नागझरी ता. केज ) असे आरोपीचे नाव आहे. सदर गुन्ह्यात बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पिंक मोबाइल पथकाकडे दिला असल्याचे दिंद्रुड पोलिसांनी सांगितले.
दिंद्रुड पोलीस हद्दीतील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील नागझरी येथील सचिन तोंडे या युवकाने फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून २१ जून ला दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी तात्काळ दखल घेत मोबाइल लोकेशनवरून तपास सुरू केला.
दरम्यान, हे युगल बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत असल्याची गोपनीय माहिती रविवारी पोलिसांना मिळाली. यावरून रात्री पोलिसांनी छापा टाकत अल्पवयीन मुलगी आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस तपासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाली. त्यामुळे आरोपीच्या विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास माजलगाव येथील पिंक मोबाइल पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, पोलीस कॉन्स्टेबल माया मस्के करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा