बीड मध्ये शेतकऱ्याला फक्त 98 पैसे विमा मिळाल्याचा दावा

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीने मदत करावी या मागणीसाठी आज भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. पीक विम्याच्या मुद्द्यावरुन पंकजा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. केजमध्ये एका शेतकऱ्याला फक्त 98 पैसे विमा मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय. तर आता सत्ताधाऱ्यांनीही त्यांचा विमा उतरवला असेल. त्यामुळे आता त्यांना घरी बसवण्याची वेळ आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. (Pankaja Munde criticizes Dhananjay Munde over crop insurance)

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीने मदत करावी या मागणीसाठी आज भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आलं.


मी लोकांना भेटत नाही असं तुम्ही म्हणत होता. आता तुम्ही कुठे आहात? जिल्ह्यात आम्ही चांगल्या सवयी लावल्या होत्या. चांगले अधिकारी आणले. तुम्ही सर्व पायदळी तुडवले. मी आमच्या काळात 52 हजार कोटी रुपये आणले. 992 कोटीचा विमा आणला. आधी मोबाईलवर मेसेज वाजला की मोदींचे पैसे यायचे. आता केजमधील एका शेतकऱ्याला फक्त 98 पैसे विमा आलाय, असा दावा पंकजा मुंडे यांनी केलाय. मराठवाड्यात आम्ही चिखल तुडवत फिरलो. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह हे भाजपचे कार्यकर्ते झाले. कारण, कोरोना काळात ते दार लावून बसले नव्हते. पालकमंत्री हातात ग्लोव्ह्ज घालून घरात बसले होते, असा टोलाही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.


‘पालकमंत्री महोदय, जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका’

यांना आता घरी बसवलं पाहिजे. या जिल्ह्याची संस्कृती चांगली करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला होता. पालकमंत्र्यांना विनंती आहे, कृपया जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका. माझा कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही. माझा कार्यकर्ता लाचार नाही. चांगले दिवस परत आणण्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करतोय. आम्ही लढण्यासाठी पाय रोवून उभे आहोत. मुंडेसाहेब दुबईच्या गुन्हेगाराला घाबरले नाहीत. त्या मुंडे साहेबांचं रक्त आमच्या अंगात आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.


‘एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी अॅट्रॉसिटी दाखल होते’

जयंत पाटील यांच्याबाबत मला बोलायचं नाही. काय आनंद झाला होता. बीड जिल्ह्यात फटाके फोडले. इथं लोक मरत होते. तुम्ही मात्र ओंगळवाणे प्रकार केले. जिल्ह्याची मान खाली घातली. पंकजाताई अमेरिकेत होत्या तेव्हा तुम्ही दौरे केल्याचं सांगता. मी अमेरिकेतून आल्यावर जनतेच्या सेवेत आले. तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे, तुम्ही कुठे आहात? अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तुम्ही भ्रष्टाचार करता. बीज जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल होत आहेत. एखाद्या माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी अॅट्रॉसिटी दाखल होते. माझ्या काळात अशी स्थिती नव्हती, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावरुन धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.