बीडच्या हॅकर तरुणाने 5 देशांतील लोकांना कोट्यवधींचा गंडा,

 

मूळचा बीड येथील रहिवासी असलेला तरुण एका गुन्ह्याखाली (Beed Hacker) मध्य प्रदेशातील कारागृहात (MP Jail) शिक्षा भोगत आहे. मात्र कारागृहातूनच त्याने विविध देशांतील लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कारागृह प्रशासनातील दोन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतल्या आरोप या गुन्हेगाराने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात नोंदवला आहे. विशेष म्हणजे हवालाच्या माध्यमातून फसवणुकीचे पैसे वळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अनेकांची चौकशी सुरु आहे. मध्यप्रदेश सायबर पोलीस (Cyber police) सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


हॅकर तरुण 2018 पासून म.प्र.च्या कारागृहात

बीड येथील रहिवासी असलेला अमर अनंत अग्रवाल हा तरुण फेब्रुवारी 2018 पासून फसवणुकीच्या प्रकरणात भैरवगड कारागृहात बंदी होता. हॅकर असल्यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांनी त्याला लॅपटॉप आणि काही क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले. त्याद्वारे त्याने अनेकांची खाती हॅक करून पैशांची अफरातफर केली. अनेक पंचचारांकित हॉटेलांनाही त्याने अशा प्रकारे गंडा घातला.


कारागृह अधिकाऱ्यांचीही चौकशी

अधिक चौकशी केली असता या गुन्हेगाराने पाच देशांतील हॉटेल, नागरिक तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अमरच्या आरोपानंतर आता तत्कालीन कारागृह अधीक्षक संतोष लडिया, सहाय्यक कारागृह अधीक्षक सुरेश गोयल व काही कर्मचाऱ्यांची मध्य प्रदेश सायबर सेलकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. अमरला आता भोपाळच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.