स्पा मसाजसाठी विचारणा, उत्तरात मिळाले 150 कॉलगर्ल्सचे दर

दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना सोशल मीडियावर वेगळाच अनुभव आला. स्वाती मालीवाल यांना जस्ट डायलवर (Justdial) स्पा मसाजसाठी (Spa Massage) माहिती मिळवायची होती, मात्र त्यांना 150 हून अधिक कॉलगर्ल्सचे दर सांगण्यात आले. मालीवाल यांनी ट्विटरवरुन ही गोष्ट शेअर केली आहे.



स्वाती मालीवाल यांचे ट्वीट काय?

स्वाती मालीवाल यांनी ट्वीट केले आहे की, ‘आम्ही जस्टडायलला कॉल करुन स्पा मसाजची खोटी चौकशी केली, त्यानंतर आमच्या फोनवर असे 50 मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी करत आहे, या व्यवसायाला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय आहे?’ असा सवाल मालीवाल यांनी उपस्थित केला आहे.

दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनाच या प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. जस्ट डायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य ती कारवाई करेन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही मालीवाल यांनी दिला.

दिल्लीत स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला जातो आहे. या ठिकाणी पोलीस वेळोवेळी छापे टाकत असतात.


पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

दुसरीकडे, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून दोन एजंटना अटक करण्यात आली आहे. हायप्रोफाईल रहिवासी इमारतीत चाललेल्या अनधिकृत धंद्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.