भाजपाच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक



उस्मानाबाद जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २७.६३ कोटी रुपयांच्या साखर कारखान्याच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्याला अटक केली आहे. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना अटक करण्यात आली आहे. 

आरोपीला शुक्रवारी कळंब येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वैद्यनाथ अर्बन बँकेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब स्थित शंभू महादेव साखर कारखान्याने २००२ ते २०१७ दरम्यान वैजनाथ सहकारी बँक, बीड येथून अनेक कर्ज घेतली होती. प्रत्येक कर्जासाठी, या कारखान्याद्वारे उत्पादित साखर गहाण ठेवण्यात आली होती. 

दरम्यान, गहाण ठेवलेल्या साखरेच्या पोत्या काढून टाकण्यात आल्या आणि नंतर थकित कर्जही नसल्याचे दाखवण्यात आले. बँकेत गहाण ठेवलेली आणि सीलबंद गोडाऊनमध्ये ठेवलेली एकूण १,५४,१७७ क्विंटल साखरसुद्धा गायब होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. ८ मार्चला कळंब पोलीस स्टेशनमध्ये आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या सदस्यांपैकी एक असलेल्या सुभाष निर्मल यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे फसवणूक आणि गुन्हेगारी षडयंत्राचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.