राज्यातील आरोग्य विभागातील स्थगित झालेल्या परिक्षांच्या तारखा जाहीर



राज्यातील आरोग्य विभागाच्या गट-क व गट-ड संवर्गातील पदांकरिता दिनांक २५-२६ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती, मात्र सदरील परीक्षा ऐन वेळेला पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला असून त्या संदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीत संबंधित परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


त्यानुसार गट-क संवर्गातील पदांकरिता दिनांक २४ ऑक्टोबर रोजी तर गट-ड संवर्गातील पदांकरिता ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असून या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध उपलब्ध होण्यासाठी अडचण येणार नाही. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड देऊन परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत द्यावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.


सदरील परीक्षांचे प्रवेशपत्र उमेदवारांना परीक्षेच्या ९ दिवस अगोदर उपलब्ध दिले असून विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम मी होऊ देणार नाही. तसेच कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार करणे आवश्यक असून परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असून काही गडबड असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवावी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.