'मी बीडचा डॉन आहे' असे म्हणत पोलिसांना शिवीगाळ सुरू केली.


 गुंडाचा पोलीस ठाण्यात धुडगूस: शिवीगाळ करत हवालदारास धक्काबुक्की


'मी बीडचा डॉन आहे',असे म्हणत  एका गुंडाने पोलीस ठाण्यात धुडगूस घातला. यावेळी त्याने संगणकाची तोडफोड करून शिवीगाळ करत हवालदारास धक्काबुक्की करून पोबारा केला. शहरातील पेठ बीड ठाण्यात हा थरारक प्रकार घडला. 

या घटनेनंतर दहा तासांनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. बाबासाहेब ऊर्फ भिंगऱ्या पांडुरंग जोगदंड, असे त्या आरोपीचे नाव आहे. ठाणे अंमलदार पी.के. ससाणे यांनी त्यास काय काम आहे, असे विचारले तेव्हा त्याने आमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत... तुम्ही सर्व जण भ्रष्टाचारी आहात... मी बीडचा डॉन आहे... मी चांगल्या चांगल्याला खेटलो आहे... मी बीडचा दादा आहे... तुम्ही मला कसे ओळखत नाही... तुम्ही पोलीस माझे काहीच करू शकत नाही... असे म्हणत पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. 

यावेळी अंमलदार ससाणे यांच्यासह सीसीटीएनएस मदतनीस व वायरलेस विभागाचे अंमलदार होते, त्यांनाही त्याने शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान, त्यास पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अंमलदार पी.के. ससाणे यांच्या सोबत झटापट केली. 

सीसीटीव्ही फुटेजचे मॉनिटर असलेले संगणक तोडून नुकसान झाले. या प्रकरणी ससाणे यांच्या तक्रारीवरून पेठ बीड ठाण्यात शासकीय कामात अडथळा व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.