बीड शहरातील बंद असलेले पथदिवे चालू होणार



बीड शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने थकबाकी न भरल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून खंडित केला होता.

 विद्युत पुरवठा चालू करण्याची मागणी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या सूचनेवरून नगरसेवकांनी अधीक्षक अभियंता र.गो. कोलप यांना निवेदनाद्वारे केली. बीड शहरातील जालना रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयात शहरातील बंद असलेले पथदिवे चालू करण्यासंदर्भात महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता र.गो. कोलप आणि नगरसेवकांमध्ये बैठक झाली. 

या बैठकीत बीड शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून देत बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. या मागणीचा विचार करून अधीक्षक अभियंता यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतली व येत्या तीन चार दिवसांत बीड शहरातील बंद असलेले पथदिवे मीटर बसवून चालू करण्याचे आश्वासन दिले. 

सध्या स्थितीत कोरोना महामारीमुळे व पावसाळा ऋतुमुळे शहरातील नागरिक अत्यंत अडचणीत आहेत.संपूर्ण शहरात पथदिवे बंद असल्याकारणाने काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.