खासदार डॉ.सुजय विखे यांना दणका; वीजबिल न भरल्याने 'या' कारखान्याचा वीज पुरवठा खंडित



भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. 

अनेकदा नोटिसा पाठवूनही कारखान्याने थकीत वीजबिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कारखान्याचा परिसर आणि कामगार वसाहत अंधारात बुडाली आहे.

राहुरी येथील डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना अनेक कारणांनी चर्चेत आहे. या कारखान्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता असून कारखाना आर्थिक अडचणीत आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी यामध्ये लक्ष घालून काही काळ कारखाना चालविला. मात्र, अडथळे येत गेले. कामगारांची देणीही थकली होती. तसेच वीजबिलही थकले. यासंबंधी कंपनीने अनेकदा नोटिसा पाठविल्या. 

मात्र, कारखान्याने कोट्यवधी रुपयांची ही थकबाकी भरली नाही. सध्या वीज कंपनीने थकबाकी वसुलीची मोहीम कडक केली आहे. त्यामुळे या कारखान्याचीही वीज तोडण्यात आली आहे.