राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयीन कोठडीत रवानगी



राज कुंद्राला डर्टी पिक्चर बनवल्याप्रकरणी न्यायालयाकडून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

राज कुंद्रा याला मुंबईच्या गुन्हे शाखेने १९ जुलैला रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर २० जुलैला न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर २३ जुलैला पुन्हा सुनावणीत २७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. आता पुन्हा यात वाढ केली आहे.

राज कुंद्रा याच्या घरातून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्याचे क्राइम ब्रँचने कोर्टाला सांगितले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत. याबाबत एका फॉरेन्सिक तज्ज्ञाची नेमणूक केली आहे.

राज यांच्या घरातून हार्ड डिस्क व मोबाईल सापडला आहे. आयओएसवर आरोपींकडून हॉटशॉट्स दाखवताना त्यांना Apple कडून १ कोटी १३ लाख ६४,८८६ रुपये मिळाले होते. 

ज्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली गेली होती ती कोटक महिंद्र बँक, येस बँक आणि अन्य बँक खाती गोठवली गेली आहेत. 

आता काही फरार आरोपींचाही शोध सुरू आहे. या प्रकरणात राज कुंद्रासह आणखी ११ जणांना अटक केली आहे.