पंकजा मुंडे OBC मोर्चाच्या बैठकीला गैरहजर



पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी व्यक्त देखील केली आहे. पण पंकजा मुंडे यांची नाराजी अजूनही कायम असल्याची चर्चा आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी झाली. पण या बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या आहेत. पंकजा यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अनुपस्थित राहिले. पक्षाचे राज्यातील दोन मोठे ओबीसी चेहरे या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.


बैठकीत काय ठरले?

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले. तेच आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी आणि लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी ओबीसी जागर अभियान करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात मराठा आरक्षण देण्याचे धाडस भाजपाने दाखवले आणि हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली. मराठा समाज 32% आहे. आज जर मराठा समाज ओबीसीमध्ये आला असता तर ओबीसी आरक्षणाची काय गत झाली असती हे सगळ्यांना माहीत आहे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात एक हजार ठिकाणी भाजपाच्या नेत्यांनी स्वतःला अटक करून घेतली. यातील कित्येक जण ओबीसी समाजाचे नव्हते, मात्र ओबीसी समाजाला आपलं समजून त्यांनी संघर्ष केला, त्यामुळे ओबीसी जागर अभियान यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी नीट प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नेते अनुपस्थित राहिल्याने वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, अशी भूमिका भाजपतर्फे मांडण्यात आली आहे. ही ओबीसी मोर्चाही बैठक होती आणि या आघाडीच्या बैठकीला कार्यरिणीचे सदस्य उपस्थित होते. अन्य नेते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असल्याने यामध्ये उपस्थित नव्हते अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.