खुशखबर! जून महिन्यात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले

 



जून महिन्यात सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण चांगले वाढलेले दिसून आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह उत्पादन व अन्य क्षेत्रांमध्येही नोकऱ्या वाढलेल्या आहेत. 

महाराष्ट्रातील मुंबई शहरात १२, तर पुण्यात सहा टक्क्यांनी नोकऱ्या वाढल्याची माहिती समोर आली आहे. 

एका नोकरीविषयक वेबसाइटने विविध नोकऱ्यांबाबतचे प्रत्यक्ष अहवाल तपासून केलेल्या संशोधनामधून ही माहिती समोर आली आहे.  

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील नोकऱ्या मोठ्या गतीने वाढत आहेत, ही बाब अधोरेखित करतानाच जून महिन्यामध्ये अन्य क्षेत्रांमधील नोकऱ्यांमध्येही चांगली वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. 

त्यामध्ये उत्पादन आणि सेवाक्षेत्राचा समावेश आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात बँकिंग क्षेत्रामधील नोकऱ्यांची वाढ २१ टक्क्यांची असून, २० टक्क्यांची वाढ नोंदविणारे आरोग्य क्षेत्र दुसऱ्या स्थानावर आहे. 

माहिती तंत्रज्ञान व बीपीओमधील वाढ प्रत्येकी १८ टक्के, औषध निर्मिती क्षेत्रामध्ये १६.९ टक्के, तर विमा क्षेत्रात १२ टक्के वाढ राहिली आहे. 


याशिवाय एफएमसीजी क्षेत्रामध्ये १६, शैक्षणिक क्षेत्रात १२.१, तर रिटेल क्षेत्रामधील नोकऱ्यांची वाढ ५ टक्के राहिली आहे. मात्र, या महिन्यातच दूरसंचार क्षेत्रामध्ये ८ टक्के नोकऱ्यांमध्ये घट झाली असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.