तुम्हाला सिमकार्ड बंद करण्याचा फोन आलाय? मग सावधान!



⚡ कोरोनामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असतानाच सायबर ठगांच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढत आहेत. 

📲 अशातच कागदपत्रे अपुरे आहेत, कार्ड जुने झाले आहेत अशी विविध कारणे देऊन सिमकार्ड बंद करण्याची भीती घालून फसवणुकीचा धंदा जोर धरू लागला आहे. 

💸 मुंबईत नुकतेच एका वयोवृद्ध डॉक्टरला सिमकार्डसाठी दहा लाख गमाविण्याची घटना ताजी असतानाच खारमधील ७६ वर्षीय आजोबांना पावणे तीन लाखांना फटका बसला आहे.

👴🏻 वांद्रे परिसरात राहणारे ७६ वर्षीय मोहनबीर चंदेलसिंग यांना २४ जानेवारी रोजी व्होडाफोनमधून बोलत असल्याचे सांगून सीमकार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. 

👉 मोबाईल क्रमांक सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर पाठविलेल्या लिंकमध्ये माहिती भरण्यास सांगितले. गुगल पेबाबतही विचारणा केली. 

🧐 गुगल पे नसून नेटबँकिंग असल्याचे सांगताच, ठगाने त्यांना दहा रुपये ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगितला. ते पैसे पुन्हा मिळणार असल्याचे सांगताच, त्यांनी विश्वास ठेवून पैसे पाठविले. 

💬 काही मिनिटात त्यांच्या खात्यातून २ लाख ८५ हजार रुपये काढल्याचा संदेश मोबाईलवर आला. तब्येत ठीक नसल्याने त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहता आले नाही. 

👮🏻 अखेर, नुकताच पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. त्यामुळे त्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

नागरिकांनी 'हे' करावे : 

● कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून खासगी माहिती शेअर करू नये. 

● येणाऱ्या कॉल, संदेशाबाबत अधिकृत ठिकाणी जाऊन खातरजमा करावी. 

● कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लीक करू नये. 

● कोणत्याही कॉलबाबत संशय येताच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.