पण...अखेर पंकजा मुंडे बोलल्या



केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना स्थान न मिळाल्यामुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात आहे. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी यावर टीका-टिप्पणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींवर खुलासा केला. 'समर्थकांमध्ये नाराजीची भावना असू शकते, पण व्यक्तिश: पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. मी अजिबात नाराज नाही,' असं पंकजा यांनी स्पष्ट केलं आहे. (Pankaja Munde on Modi Cabinet Expansion)


केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, ती चर्चा फोल ठरली. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं डॉ. भागवत कराड यांना संधी दिली. या सर्व घडामोडींमुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून आज यावर थेट भाष्य करण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांना संपवण्यासाठी वंजारी समाजातून भागवत कराड यांना मंत्रिपद दिलं गेलं आहे, अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय बोलतात याकडं लक्ष लागलं होतं. त्यांनी ही सर्व चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट केलं. सर्व मंत्र्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केल्याचंही पंकजा यांनी यावेळी सांगितलं.


समर्थक नाराज असू शकतात, पण...

गोपीनाथ मुंडे यांचा अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर प्रभाव आहे. मुंडे कुटुंबावर प्रेम आहे. त्यामुळं समर्थकांमध्ये नाराजीची भावना असेल हे मी नाकारू शकत नाही. मात्र, माझ्या मनात किंवा कुटुंबामध्ये तशी कुठलीही नकारात्मक भावना नाही, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

मुंडे कुटुंबाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं याबाबत काय वाटतं असं विचारलं असता पंकजा म्हणाल्या, 'असं काही मला वाटत नाही. मुंडे साहेबांचा प्रभाव फक्त मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातच नाही, देशातील अनेक भागांमध्ये आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न होतोय असं वाटत नाही आणि तसा तो झाला तर त्यांचा प्रभाव वाढेल.'