पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा, पडळकर असे का म्हणाले वाचा सविस्तर



पुणे - बारामती विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करतात. त्यासोबतच, बारामतीमधील पवार घराणे त्यांच्या टीकेच्यास्थानी असते. काही दिवसांपूर्वीच पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर शाब्दीक वार केले. बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहनच पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले आहे.

पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे व त्यांचा गळा घोटण्याचे महापाप करत आहे. पड़ळकर आज बारामतीच्या दौऱ्यावर असून बारामतीच्या विविध भागात वंजारी,तेली, शिंपी, माळी, रामोशी समाजाच्या बैठका घेत आहेत. यादरम्यान, पवार अजित पवार आणि पवार कुटुंबीयांवर पडळकर यांनी टीका केली. बारामतीच्या जनतेला पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आवाहन त्यांनी केले.


राष्ट्रवादी जातीयवादी पक्ष

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्रीपदावरुन हटविण्याची चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे. त्यावरुन, धनगर समाजाचे पालकमंत्री आहेत, त्यांना हटविण्याची मोहीम राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून होत आहे, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष असल्याचा घणाघाण गोपीचंद पडळकर यांनी केला. 5 वर्षाच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं, तरी ते सांगेल, कोणता पक्ष जातीयवादी आहे, असे पडळकर यांनी म्हटलं.


अजित पवारांनी गाढवाचा नांगर फिरवला

पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे पुढे आली. पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आहेत, भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत, एससी-एसटी आहेत, तसेच विशेष मागास प्रवर्गही आहे. या सर्वांच्या बाबतीत, ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांनी, या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर गाढवांचा नांगर फिरविण्याचं काम केलंय, हे सुस्पष्टपणे दिसतंय, असे प्रत्त्युत्तर पडळकर यानी दिलं आहे.