बीड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे कधी उघडणार ?



गेल्या वर्षापासून देश कोरोनाशी संघर्ष करत आहे. कोरोनाला कमी करण्यासाठी आत्तापर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनला सध्या काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली असली तरी धार्मिकस्थळे अद्याप तरी उघडण्यात आलेले नाही. जिल्हाभरात अनेक ठिकाणी मोठमोठे धार्मिकस्थळे असल्याने तेथील छोटे-मोठे व्यावसायिक धार्मिकस्थळे बंद असल्याने अडचणीत आले. त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने धार्मिकस्थळे उघडण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी होवू लागली आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झालेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मध्यंतरी लॉकडाऊनला सुट देण्यात आली होती. मात्र दुसर्‍या लाटेचा धोका पाहता पुन्हा महाराष्ट्रात काही दिवस लॉकडाऊन करण्यात आले. सध्या काही प्रमाणात व्यवहार सुरू असले तरी पुर्ण वेळेत व्यवहार सुरू झालेले नाही. हळुहळु व्यवहार सुरू करण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. व्यवहार सुरू असले तरी धार्मिकस्थळे अद्यापही उघडण्यात आलेले नाही. धार्मिक स्थळामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय चालतात. मात्र धार्मिकस्थळ बंद असल्याने व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील मंदिर, चाकरवाडी, कपिलधार, सौताडा यासह अन्य ठिकाणी मंदिर आहेत. त्या मंदिराच्या परिसरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. शासनाने धार्मिकस्थळ उघडण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी होवू लागली आहे.