गावातील एक दिवस - माझी लेखमाला



 गावातील एक दिवस

शक्यतो उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी जात असे. पाऊस पडण्यास अजून दीड दोन महिन्याचा अवकाश असायचा. रात्री मृग नक्षत्र डोक्यावर थोडेसे पूर्वेला कललेले दिसे. दरवर्षी साधारण ७ जून रोजी सूर्य मिरगात (मृग नक्षत्रामध्ये) प्रवेश करतो तेव्हा पाऊस सुरु होतो, हे शेतकऱ्याला माहीत असतेच. तेव्हा मिरीग कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष असे. त्यामुळे उन्हाळ्याचे सुरुवातीचे दोन महिने संपले कि गावातील लोकं सुस्ती टाकून देऊन शेतीच्या पुढच्या मोसमाकरीता सिद्ध होत असत.


मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत गावाची यात्रा संपन्न झालेली असे. गावातील लग्नकार्ये नुकतीच होऊन गेली आहेत, हे घराबाहेरील आंब्याची सुकलेली डहाळे घातलेली मंडपे सांगत. सोमवती अमावस्या, होळी, गुढी पाडवा, चैती पुनव इत्यादी सण उलटून गेले असत आणि आखिदीच्या सणाची (अक्षय तृतीया) प्रतीक्षा असे. काहीजण बैलगाड्या भरून सहकुटुंब निमगाव-दावडीच्या खंडोबाची यात्रा करून आलेली असत. बऱ्याच लोकांनी आखिदीच्या मुहूर्तावर घरातील काहीना काही कार्याची जोडणी अगोदरच करून ठेवली असायची. कोणीतरी घराची डागडुजी करीत असे, तर काहीजण नुकत्याच बांधलेल्या नवीन घराच्या घरभरणीची पूजा घालण्याच्या गडबडीत असे. गावात अशी लगबग असली तरी देखील गाव थोडे निवांतच असे.


गावाचा दिवस सुरु होई सूर्योदय होण्याअगोदर. घरातील बायका उठत आणि घरोघरी जात्याची घरघर आणि जात्यावरच्या ओव्या ऐकायला मिळत.


“सरीलं दळाणं माझी उरली पायली …

सई बाई गं, बाई …

सोन्याची पाच फुलं भीमाशंकरी वाहीली …

सई बाई गं, बाई …

सरीलं दळाणं माझ्या सुपाच्या कोन्याला …

सई बाई गं, बाई …

आवुक मागते माझ्या कुकाच्या धन्याला …

सई बाई गं, बाई …“


अशा ओव्यांना जात्याची घरघर साथ द्यायची.

(ओवी शब्दांकन: सौ. संगीता रोहिदास शिंदे, कुडे खुर्द. संकलन – सौ. मंगल वरुडे, पुणे.)

जात्याची घरघर घरातील एकेकाला हळूच झोपेतून जागे करी. घरचा कर्ता माणूस उठून लगेचच कामाला तयार होई. चुलीच्या औलावर मोठे भांडे भरून पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवले असायचे. त्यातील गरम झालेले पाणी तांब्यात भरून घेवून घराबाहेरच्या दगडावर उभे राहून तोंड धुवायचे, मग चुलीतली राखुंडी किंवा तंबाखूची मशेरी लावत, लिंबाच्या अथवा बाभळीच्या काडीने दात घासत घासत परसाकडे गावाबाहेर जाऊन आले कि माणूस झाला ताजातवाना. त्याकाळी सकाळी (पहाटे) उठल्यावर चहा पिण्याची गरज आणि सवय ह्या दोन्ही नव्हत्या. मग घरचा कर्ता माणूस बादली किंवा कळशीत थोडे पाणी घेवून वाडग्याकडे जाई. गुरांना गवत वगैरे खायला देई. गाई म्हशीचं दूध काढून बादली, कळशी किंवा चरवीतून घरी घेवून येई. तोपर्यंत चांगलेच उजाडलेले असे. मग लगेच लगबग होई ती, गावच्या डेअरीमध्ये दूध घालण्याची. डेअरीचे सर्व सभासद घरातील दुधाच्या बादल्या, कळश्या किंवा चरवी घेवून लगेच डेअरीत जाऊन दूध जमा करीत.


आमची डेअरी मारुतीच्या मंदिरासमोर होती. मारुतीच्या मंदिरामध्ये त्यावेळेस काही वर्षे रोज सकाळी बॅटरीवर चालणारा सार्वजनिक रेडिओ लावला जायचा. मंदिराच्या आतील बाजूला एका बंदिस्त पेटीमध्ये रेडिओ होता आणि बाहेरच्या बाजूला कौलांच्यावर मोठा भोंगा लावलेला होता, त्यावर सकाळी सकाळी छान भक्तिगीते ऐकायला मिळायची, बातम्या लावल्या जायच्या. यशवंतमामा (शेळके) यांच्यावर रेडिओ लावण्याची, बंद करण्याची जबाबदारी होती. काही गावकऱ्यांचे गोठे गावाबाहेर होते, ते घरी न जाता सरळ डेअरीमध्ये दूध घालून मगच घरी जात. थोड्याच वेळात दूध संकलन करणारा ट्र्क गावात येई. जमा झालेल्या दुधाचे कॅन्ड (कॅन्स) ट्रकमध्ये चढविले जाई, रिकामे कॅन्ड उतरविले जाई, अन आल्यासारखा ट्रक गावातून परत जाई. तेवढ्या चार पाच मिनिटातच ज्यांना तालुक्याला किंवा दुसऱ्या गावाला लवकर जायचे असे अशी माणसे ट्रकचा आवाज ऐकून अगोदरच तयारीने आलेली असत, ती माणसे दुधाचे कॅन्ड ठेवण्याअगोदर पटापट गाडीत चढलेली असत. त्यातल्या त्यात जरा मोठा कारभारी माणूस असेल, तर गोड बोलून ट्रकच्या केबीनमध्ये जागा पटकावत असे. हा दूध संकलनाचा ट्रक त्याकाळी वाड्यापर्यंत जायचा. मात्र पावसाळ्यात चार महिने गावाच्या खालूनच कुडे बुद्रुकला जायचा आणि परत फिरायचा, तेव्हा गावकरी डोक्यावर दुधाचे छोटे कॅन्ड घेऊन भर पावसात भराभरा चालत सुमारे दीड किलोमीटरवरील फाट्यापर्यंत जायचे.


तोपर्यंत घरच्या बाईने भाकरी, कोरडयास अथवा, कालवण असे काही तरी केलेले असायचे. सकाळीच जात्यावर काढलेल्या ताज्या पिठाच्या भाकरी हातावर थापून चुलीवर भाजण्याचे काम घरात चालू असे. मग अंघोळ केली जाई. बहुतेक अशा वेळेस चहा होत असावा. बऱ्याच घरात दूध नसायचे ते कोरा चहा प्यायचे. काही घरात चहा न पिता सरळ भाकर, भाजी खाऊन सकाळचा नाष्टा केला जाई. मुले असतील तर त्यांची शाळेत जाण्याची तयारी सुरु होई. माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सुमारे दोन अडीच किलोमीटरवरील कुडे बुद्रुकाच्या शाळेत जात, त्यांना लवकर निघावे लागे. प्राथमिक शाळा गावात होतीच. ज्या घरात माणसांची कमतरता होती त्या घरात सकाळचे मुलांचे जेवण आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था सकाळी एकदाच केली जाई, म्हणजे घरातली माणसे दिवसभर कामाला मोकळी. तोपर्यंत गावात ऊन आलेले असे, म्हातारी हातात माणसे अंगण, एखादा चौथरा अथवा देवळाजवळ थोडा वेळ ऊन खात खात सगळीकडे लक्ष देऊन बसत.


पुरुष मंडळी कामाच्या तयारीला लागत. स्त्रिया, मुली पाणी भरण्यासाठी डोक्यावर, कमरेवर हंडा, कळशी अशी तीन चार छोटी मोठी भांडी, एका हातात पाणी भरण्याची बादली घेऊन विहिरीकडे निघत. विहीर गावाच्या बाहेर खालच्या बाजूला सुमारे तीन चारशे मीटर अंतरावर होती. साधारण तासभर चार पाच खेपा हेलपाटे घालून घरात पाणी भरून ठेवले जाई. तोपर्यंत पुरुष मंडळी गोठ्यात जाऊन गाई, म्हशी, कालवड, वासरे, शेळ्या यांना रानात चरण्यासाठी मोकळे सोडत. बैलांना मांडवातून बाहेर काढून उन्हात बांधत. नंतर शेण गोळा करणे, उष्टे, खराब झालेले गवत, कडबा काढून ते गोठ्याबाहेरील शेणखताच्या उकिरड्यावर अथवा खड्ड्यामध्ये टाकणे इत्यादी कामे करून गोठा साफ करत. मग बैलांना विहिरीवर पाणी पाजायला नेले जाई. पाणी पाजून परत आल्यावर बैल बांधून ठेवली जात आणि त्यांना दिवसभर पुरेल एवढे गवत, कडबा देवून पुरुष मंडळी घरी येत. पुन्हा एखादी खेप विहिरीवर करून दोन तीन बादल्या पाणी गोठ्यात भरून ठेवले जाई.


एखादा गडी हातात कुऱ्हाड, दोन चार दोऱ्या, कमरेला कोयता लावलेला अशी तयारी करून रानाकडे निघे. पावसाळा तोंडावर आल्याकारणाने लाकूडफाटा साठविण्यासाठी एखाद्या मोठ्या झाडाच्या चार पाच मोठ्या फांद्या तोडल्या तरी सहा आठ महिने पुरेल एवढी फाटी गोळा होत. मग हा गडी रानात फाटी तोडण्याचे काम करीत राही. झाडावर चढून प्रथम मोठ्या फांद्या तोडून खाली टाकी, खाली उतरून मोठ्या फांद्यांचे दीड ते दोन मीटर लांबीचे एकसारखे तुकडे करून ठेवत असे. दुपारच्या वेळेस घरधरीण डोक्यावर भाकरीचे टोपले, कोरड्यास अथवा कालवणाचा टोप, त्यातच एका कडेला पाण्याची छोटी कळशी घेऊन येई. मग दोघ मिळून जेवण करीत. कधीकधी मुलं पण आईच्या मागोमाग आलेली असत. जेवण झाल्यावर गाडी परत फांद्या फोडत बसे अन घरधनीण तोडलेली फाटी गोळा करून एका जागी ढीग रचून ठेवी. उन्हं उतरून, सूर्य मावळतीकडे झुकल्यावर दोघे घराकडे परतत. एक दोन दिवस फाटी तोडण्याचे काम केल्यावर मग एखाद दिवशी बैलगाडी घेवून रानात जाऊन फाटी घरी आणली जाई. मग तो लाकूडफाटा घरात कोरड्या जागेत व्यवस्थित रचण्याचे काम एक दिवस चाले.


कोणी दुसरा गडी पावसाळ्यापूर्वीची शेतीची कामे करत असे. गेले आठ महिन्यापासून घराबाहेरच्या अथवा गोठ्याबाहेरच्या उकिरड्यावरचे शेणखत वरखाली करून त्याला उन दाखविले जाई. मग दोन चार दिवसांनी ते शेणखत वावरात अथवा खाचरांमध्ये नेऊन पसरविले जाई. वावरात, खाचरात दाढ भाजण्याचा कार्यक्रम होई. काहीजण शेत नांगरत असत. काहीजण पेटारा, कुळव चालवायचे. घराघरांत बियाण्यासाठी भुईमुगाच्या शेंगा सोलण्याचे काम सुरु असे. अशा तऱ्हेने जो तो पावसाळ्यापूर्वीची शेतीची मशागत आणि कामे करण्यात दंग राही.


दिवसभर शेतात राबून घरे आपल्यावर देखील कामातून सुटका नसे. बाईमाणसे घरातील स्वयंपाक, धुणीभांडी करणे, मुलांची गाऱ्हाणी ऐकून त्यांचे समाधान करणे, त्यांना हवे नको ते बघणे यात गुंतून जात. घरी आल्याबरोबर गडी माणसे पुन्हा गोठ्याकडे जात. घरातील पोत्यातून काढलेला कोंडा, पेंडीचे तुकडे, थोडे जाडे मीठ व पाणी घालून दोन चार लोखंडी घमेली भरून घेत. दूध काढण्यासाठी बादली, कळशी, चरवी अशी भांडी असे साहित्य सोबत घेवून परत वाडग्याकडे जावे लागे. सकाळी चरण्यासाठी सोडलेल्या गाई, म्हशी वगैरे परत आली असत, त्यांना पाणी दाखवून त्यांच्या जागेवर पुन्हा बांधले जाई. थोडी साफसफाई पण केली जाई. तोवर बैलांना पेंडीच्या घमेल्यांचा वास लागलेला असायचाच. दाव्यांना जोर देवून देवून त्यांची चुळबुळ आणि वळवळ सुरु असे. त्यांच्या पुढे पेंडीचे घमेलं ठेवले की त्याचा वास गाई आणि म्हशीला जायचा, मग त्यांची चुळबुळ सुरु व्हायची. गाई म्हशींच्या पुढे पेंडीचे घमेलं ठेवले कि त्या पेंड खाण्यात दंग व्हायच्या कि मग त्यांचे दूध काढणे सोपे व्हायचे. सरते शेवटी गुरांना पुन्हा रात्रीची वैरण घालून. जमा झालेले दूध घेऊन गडी घरी येई. घरी आल्यावर दूधाची व्यवस्था लावली, तेव्हाच तो रिकामा होई.


गडी हातपाय धुवून ताजातवाना होई. मुलांची चौकशी करी. घरात रडारड सुरु असे, तर एखाद्याला दम अथवा फटके देई. खूपच लहान मुलं असेल तर त्याला घेवून जरावेळ बसे. अजून घरात जेवण तयार झालेलं नसे. गाडी उठून घराबाहेर निघे, “देवळात कीर्तनाला जाऊन आलोच’, असे सांगून हात कंदील घेऊन विठ्ठल मंदिरात जाई. तोवर गावातील पुरुष, म्हातारे, म्हाताऱ्या, मुलं अशी बरीच जण विठ्ठल मंदिरात जमा झालेली असत. एकजन भितींवर टांगलेली विणा हातात घेऊन मध्यभागी उभा राही. त्याच्या दोन्ही बाजूला टाळकरी उभे राहत. अन मग सुरु होई हरिपाठ.


“देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी”,

अशी सुरुवात होऊन संपूर्ण हरिपाठ म्हटला जाई. मग भजन, एखादा अभंग शेवटी आरती. देवळात भगवंताच्या नामस्मरणामध्ये साधारण अर्धा तास जाई. मग सर्व घरी परतत.

घरी आल्यावर जेवण तयार असे. जेवणखाणे झाले कि अंथरुणावर पडावे. देवाचे नाव घ्यावे कि दिवसभराचा सर्व शिण नाहीसा होतो अन डोळे आपोआप मिटले जातात.

त्याचे हे रहाटगाडगे उद्या पुन्हा सुरुच राहणार आहे.


पण घरधनी झोपले तरी घरधनीण आजून कामातच आहे. भांडीकुंडी झाली. सर्वांची अंथरून टाकून झाली. सर्व झाकपाक करून झाली. तेव्हा तिला आपण थकल्याची जाणीव होते. माउली अंथरूणावर अंग टाकते. अगदीच लहान पोर घरात असेल तर त्याला जवळ ओढून कुशीत घेते अन लगेच झोपून जाते. कारण तिला सर्वांच्या शेवटी जरी झोपावे लागले तरी उद्या सकाळी पुन्हा सर्वांच्या अगोदर उठायचे आहे. ह्या सर्व भानगडीत देवाचे नाव घ्यायचेच राहिले हे तिच्या लक्षातच येत नाही. आणि दिवसभर कष्ट करून थकलेल्या माऊलीला त्याची गरजच काय? ‘कर्म हीच पूजा’ हे तिला न सांगताच तिने ते आचरणात आणले आहे.


तिचे हे रहाटगाडगे उद्या पुन्हा सुरुच राहणार आहे.

ह्या सगळ्या भानगडीत आपण स्वतःसाठी जगायचंच विसरलो हे सुध्दा ती दोघे विसरून गेलीत.

पुढच्या भागात आणखी आठवणी.

छायाचित्र व लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९.