लेखमाला - माहेरची साडी



 माहेरची साडी


[फ्लॅशबॅक ….

आमची आत्या देवाघरी गेल्याची वाईट बातमी आली. सख्खी नसली तरी तिचा आमच्यावर खूप जीव. वडिलांपेक्षा वयाने थोडी मोठी. वडिलांना बहीण नसल्याकारणाने तिच्यावर वडिलांचे प्रेम होते. आम्ही गावाला तिच्या घरी गेलो कि, आमच्यासाठी काय करू आणि काय नको असे तिला व्हायचे. घरची गरिबी असली तरी प्रेमाची श्रीमंती ओसंडून वाहत होती. अंत्यविधीला जाणे कर्तव्यच होते. वडील नसल्याकारणाने माझ्यावरच मोठेपणाचे ओझे आले होते.

अंत्यविधीला निघताना पत्नीने एक हिरव्या रंगाची नवी साडी पिशवीत घालून दिली.

मी म्हटले, “हे काय आता? ही साडी कोणाला द्यायची? नंतर देऊ कधी, आता प्रसंग काय आहे”.

ती म्हणाली “हि ‘माहेरची साडी’ आहे, आत्यासाठीच आहे, माहेराहून शेवटची साडी दिली जाते. ती तिच्या अंगावर घालायची असते’.

मला हा प्रकार यापूर्वी कधीच माहित नव्हता.

मी गावी अंत्यविधीला पोहोचलो. थोडा उशीरा झाला होता. आत्याचे कलेवर सरणावर ठेवले होते. पुढे होऊन दर्शन घेतले. नमस्कार केला. गर्दी होती. थोडे बुजल्यासाखे झाले. पत्नीने बजावले होते, हि साडी आत्याच्या अंगावर घालायची. मला काही सुचेना. कोणाला कसे आणि काय विचारायचे ते कळेना. तेवढ्यात आत्याचा सख्खा भाचा तिथे आला. तो लगेच घाईघाईत पुढे गेला, सोबतच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून साडी काढली आणि सरणावर आत्याच्या कलेवरच्या बाजूला ठेवली, आत्याला नमस्कार केला आणि मला बघून माझ्याजवळ आला. मी काही न बोलता माझी पिशवी दाखवली. आणि नजरेनेच विचारले ‘आता काय करू?’. तो म्हणाला ‘जा, चितेवर आत्याच्या बाजूला ठेवून ये.’ मी पुढे जाऊन पिशवीतील नवी साडी काढून चितेवरील आत्याच्या बाजूला ठेवून माघारी फिरलो. नंतर प्रेताला अग्नी दिल्यावर सर्वजण निघालो. आत्याच्या प्रेताबरोबर तिच्यासाठी आणलेल्या चारपाच ‘माहेरच्या साड्या’ जळून राख झाल्या.


मी घरी परत आल्यावर पत्नीला हा प्रकार सांगितला आणि म्हटले,

“आपण आत्याला माहेरची साडी तर दिलीच, पण ती मेल्यावर तिला दिली. नुसती तिच्याबरोबर चितेवर ठेवली, तिचा तिला काय आनंद मिळाला? तिला काय सुख मिळाले असेल?”


“आत्या जेव्हा जिवंत होती तेव्हा तिला आपण अशी साडी का नाही दिली? ती मिळाल्यावर तिला किती आनंद मिळाला असता? नवी साडी घालून अख्ख्या गावभर मिरवून सांगितले तिने असते, “माझ्या भाच्यानं दिलीय मला”. मग आम्ही आत्याला हा अनुभव तिच्या जिवंतपणी का नाही दिला? तिचा हा अनुभव आम्ही का हिरावला?”


फ्लॅशबॅक पूर्ण …]


आपण सर्वांनीच १९९१ सालचा प्रचंड गाजलेला ‘माहेरची साडी’ हा स्त्रीप्रधान चित्रपट नक्कीच पाहिला असेल. चित्रपट पहाताना न रडलेले स्त्री-पुरुष शोधूनही सापडणार नाही. अख्खा महाराष्ट्र हा चित्रपट पाहून रडलेला आहे. कोणाला बहिणीची आठवण आली, कोणाला मुलीची आठवण आली. तर कोणाला आपल्याच घरातील अथवा आजूबाजूला वावरणारी माहेरवाशीण आणि तिचे होणारे हाल यांची जाणीव झाली असेल. कित्येक सासू, सासरे, नणंदा, नवरे वगैरे दुष्ट मंडळींना आपल्या चुका लक्षात येऊन त्यांच्याकडून घरच्या लक्ष्मीचा होणारे छळ कदाचित थांबले असतील. कित्येक आईवडील, भाऊ यांना आपल्या मुलीचे, बहिणीचे हाल लक्षात आल्यावर त्यांनीही आपल्या लेकीवर होणारे अत्याचार थांबवून तिच्या संसारात लक्ष घालून तिला सुखात ठेवण्यासाठी धडपड देखील केली असेल.


त्या चित्रपटातील प्रचंड गाजलेले सर्वांच्या आवडीचे ‘सासरला ही बहीण निघाली ….., नेसली माहेरची साडी’ हे गाणे सर्वांनीच कित्येक वेळ ऐकले असेल. ह्या गाण्यात दाखविल्या प्रमाणे आपल्या घरची लाडकी लेक तिच्या सासरी पाठवण करताना लेकीला माहेरची साडी नेसवलेली असते. वेळोवेळी ती माहेरची साडी लेकीला कायम धीर देते, माहेरच्या प्रेमाची उब देते, आठवण करून देत असते.


पुढे लेक सासरी तिचा संसार फुलवते. तिच्या संसारवेलीवर नवीन पिढी वाढली जाते. तिच्या घरच्या लेकी सासरी जातात. तिच्या घरी सुना येतात. अशा तऱ्हेने आपल्या ती घरची लेक पूर्ण आयुष्य जगून एके दिवशी वार्धक्याने देवाघरी जाते. तिचे जीवनचक्र येथे संपते.


त्यावेळेस तिला शेवटची साडी नेसवली जाते ती सुद्धा ‘माहेरचीच साडी’ असते.

अंत्यविधी प्रसंगी तिच्या माहेराहून आलेली जवळपास प्रत्येक व्यक्ती आपल्याकडून एक एक माहेरची साडी आणतो. मृत स्त्रीच्या अंगावर एकच साडी नेसवलेली असते. मग अशा आणखी आणलेल्या माहेरच्या साड्या सरणावर ठेवून दिल्या जातात. आणि प्रेताला अग्नी दिला कि त्या अग्नीत जाळून राख होतात.


महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सगळीकडे हि प्रथा पाळली जाते. अशा प्रकारे कित्येक नवीन साड्यांची कायम राख होत असते. त्या माहेरच्या साड्यांचे सुख मात्र मृत स्त्रीला मिळू शकत नाही. ह्याचा विचार आपण कधी केला का? ह्या गोष्टीकडे डोळसपणे आपण कधी पाहिले का? थोडे भावनेच्या पलीकडे जाऊन आपण याचा विचार करूया.


आपण ह्या प्रथेला वेगळे वळण नाही देऊ शकत का?

नक्की देऊ शकतो. पण कसे?

माहेरच्या सर्व नातेवाइकांनी विचार विनिमय करून अंत्यविधी प्रसंगी सर्वांतर्फे एकच छान ‘माहेरची साडी’ आणावी आणि मृत स्त्रीला नेसवावी. सर्व विधी पार पडल्या नंतर ज्या ज्या नातेवाईकाला ‘माहेरची साडी’ द्यायची होती त्यांनी त्या साड्या आता विकत घेवून सासरी नेऊन द्याव्यात. आणि अशा तऱ्हेने जमा झालेल्या सर्व साड्या मग सर्वांनी मिळून आपल्या किंवा आजूबाजूच्या गावातील गरीब, गरजू स्त्रियांना, एखाद्या महिला आश्रमास किंवा अन्य संस्थेमध्ये आपल्या प्रिय मृत व्यक्तीची आठवण म्हणून देणगीदाखल, भेटीदाखल द्याव्यात. आपल्या त्या प्रिय मृत स्त्रीच्या आत्म्यास नक्कीच आनंद होईल. तसे पाहिले तर तेराव्याला जवळपासच्या स्त्रियांना बोलावून त्यांना साड्या दिल्या जातातच, पण ती एक प्रथा म्हणूनच दिली जाते.


मृत स्त्री आणि तिचे भाऊ जर जिवंत असतील तर मात्र त्या स्त्रीला दिवाळी सण म्हणून साडी भेट दिली जाते. एरवी फक्त एखादे लग्न कार्य तिच्या माहेरी निघाले तर आत्याबाई, मावशी, मामी अथवा आजी, पणजी इत्यादी रूपाने मानपानाची साडी मिळते तेवढेच. पण या मानपानात प्रेम कमी आणि रितीरिवाजच जास्त जाणवतो.


अन्यथा माहेराहून मिळणारी दरवर्षीची हक्काची माहेरची साडी मिळायची, ती भाऊ गेल्यावर बंद झालेली असते. ती कायमचीच.

ह्या प्रकारातील स्त्रिया म्हणजे बहुतेकवेळ आपल्या वडिलांची बहीण म्हणजे ‘आत्या’ असते. आजही आपली आत्या हि सासरीच आहे हे लक्षात घ्या. भावाच्या आणि वहिनीच्या मुलीमुलांना ह्याच आत्याने तिच्या तरुणपणी अंगाखांद्यावर खेळवलेले असते. अशा ह्या आत्याला ती जिवंत असताना दिवाळसण म्हणून आपण शक्यतो काहीच देत नाही. तिची माहेरची साडी तिला कायम मिळायलाच हवी. आणि ती माहेरची साडी तिला तिच्या जिवंतपणेच वापरायला मिळायला हवी. अन्यथा मेल्यानंतर सरणावर आपल्या मृत शरीराच्या बाजूला ठेवलेल्या साड्यांची राख तिला आनंद नाही देऊ शकत. हा आनंद तिला जिवंतपणेच मिळणे हा तिचा हक्क आहे. आणि केवळ साडीच द्यावी असे काही नाही. तिला अंगावर घालून मिरवता येईल अशी भेटवस्तू उदाहरणार्थ शाल, स्वेटर किंवा अशा अन्य वस्तू आपण तिला देऊ शकतो. यातच खरेच सुख तिला मिळू शकेल. आणि केवळ आत्याच नाही तर आपल्या प्रेमाच्या सर्व वयस्क स्त्रिया उदा. मावशी, मामी अथवा आजी, पणजी, काकू इ. ज्या ज्या असतील त्यांना अधूनमधून द्यावी.

माझ्यातर्फे मी हि प्रथा यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने सुरु केलेली आहे. ह्या दिवाळीत गावी जाऊन नात्यातील चार म्हाताऱ्यांना भेट वस्तू दिली आहे. अजूनही नात्यातील बऱ्याच स्त्रीया आहेत. त्यांना त्यांच्या जिवंतपणीच भेट वस्तू द्यायचा संकल्प केलेला आहे, तो लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.

तुम्हीही अशी प्रथा सुरु करावी आणि आपल्या घरच्या सर्व म्हाताऱ्या लेकींना ‘माहेरची साडी’ अथवा भेटवस्तू त्यांना त्यांच्या जिवंतपणीच देऊन त्या म्हाताऱ्यांच्या डोळ्यातील आनंद आणि आसू दोन्ही पहावेत, अनुभवावेत.

(काही पुढारलेल्या कुटुंबातून अशी काळजी घेतली जात आहे. तरी सर्वसाधारण समाजात या विषयी कमी जागृती दिसते, म्हणून हा लेखप्रपंच.)


छायाचित्र सौजन्य: गुगल.कॉम

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९