चोरून आयपीएल बघणे अंगलट
करोनाचे सर्व नियम, निर्बंध पायदळी तुडवून आयपीएल क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेलेल्या दोन क्रिकेट शौकिनांना मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियमला लागूनच असलेल्या हॉकी स्टेडियमच्या टॉवरवरून हे दोघे चोरून सामना पाहत होते.
राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध लादले असून सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. आयपीएलचे क्रिकेट सामने करोनाच्या संसर्गामुळे प्रेक्षकांविना खेळविले जात आहेत. दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर रविवारी दिल्ली आणि पंजाब यांच्यामध्ये लढत होती. यासाठी वानखेडे स्टेडियमबाहेर आणि आतमध्ये पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. वानखेडे स्टेडियमला लागून असलेल्या हॉकी स्टेडियमच्या टॉवरवर चढून काहीजण सामने पाहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या पथकाने हॉकी स्टेडियमध्ये जाऊन टॉवरवर बसलेल्या सचिन पाटील आणि विकी नाईक या दोघांना अटक करण्यात आली. नंतर त्योची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा