Breaking News महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार?
मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आता लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली पण तिसरी लाट येण्याआधी सरकारला राज्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.
ज्यामध्ये सर्वात प्रथम लसीकरण, आयसीयू बेड्सची संख्या, जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठ्याचा समावेश आहे. त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत महाविकास आघाडीतले नेते करत आहेत.
कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची प्राथमिक चर्चा केली जाईल. यामध्ये शहरनिहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॅाकडाऊनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल यावर सगळं अवलंबून आहे.
लॉकडाऊनंतर राज्यात चित्र हळूहळू बदलत असल्याचं चित्र आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांत 3876 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे, जी पूर्वीपेक्षा खूप कमी आहे.
आतापर्यंत 5 लाख 46 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के झाले आहे.
सध्या मुंबईत 70 हजार 373 सक्रीय रुग्ण आहेत.
तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 62 दिवसांवर गेला आहे.
आतापर्यंत एकूण 36 लाख 01 हजार 796 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92 टक्के झाले आहे.
लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडतोय. पण रुग्णसंख्या कमी करण्यात मोठी मदत होत आहे. 1 मे पासून लसीकरण सुरु करायचं आहे, राज्यात सध्या 4 हजार लसीकरण केद्र आहेत ते दुप्पटीनं वाढवायचे आहेत, 18 ते 44 पर्यंत साधारणत: साडेपाच कोटींच्या घरात संख्या आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी सरकारला नियोजन करायचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवलं तर नक्कीच याचा परिणाम राज्यातली कोरोनाची परिस्थिती सुधारण्यावर होईल असे मंत्री बोलतात.
दुसऱ्या लाटेतून जाताना महाराष्ट्राला चांगलेच चटके बसले आहेत. राज्य आतापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी करतंय, लॉकडाऊन वाढवला तर कोरोनाग्रस्तांची आकडेवारीसह कोरोनासाठी लागणारी साधनसामुग्री वाढवतां येईल. यासाठी हा लॉकडाऊन महत्वाचा मानला जातोय, जर पुन्हा लॉकडाऊन उघडण्याची घाई केली तर राज्यात मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता नाकारतां येत नाहीय. त्यामुळे आता राज्याचे नेते कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
टिप्पणी पोस्ट करा