कानाचे रोग

 कानाचे रोग - कानाची रचना वगैरे माहिती शारीरशास्त्र व इंद्रियविज्ञान या लेखांत आढळेल.  कानाचा बाहेरील दृश्य भाग हा श्रवणोंद्रियाचा कर्णा अगर ध्वनिलहरींचा संग्रह करणारा नलिकायुक्त बाह्य अवयव होय.  या बाह्य कर्णास होणारे मुख्य रोग पुढील होतः-

     पॅरेंटिंग मराठी Click  आरोग्य Click



इसब अगर कान चिडणेः- यांत आरंभीं बाह्य कान फार लाल होऊन तो सुजतो; त्यास स्पर्शहि सहन होत नाहीं व त्यावर सुजेचा काळेनिळेपणा व तुकतुकी दिसते.  नंतर पुटकुळ्या येण्यास आरंभ होऊन त्यांतून चिकट लस निघते व ती वाळून त्याचे पापुद्रे चिकटून बसतात.  ते आपोआप गळले अथवा मुद्दाम काढले तर खाली लाल त्वचा असते.  रोग जुना झाला तर कानाचा बराच भाग रोगग्रस्त होतो, पण इतकी लाली नसते.  कानाच्या नळींतहि रोग पसरल्यामुळें कानाच्या पडद्यापर्यंत कोंडा व खपल्या असतात. जरासा बहिर पणा व कानांत दडा बसल्यासारखें वाटणें व कर्णनाद हीं लक्षणें यांत असतात.  उपचारः- नवीन विकार असल्यास अफूच्या अर्काचे थेंब टाकून लेड असिटेट या औषधाच्या धावनाची पट्टी कानावर ठेवावी अथवा झिंक ऑक्साइड आणि स्टार्च हे सहभाग घेऊन त्यांची मिश्र पूड ब्रशाने शिंपडावी.  पांढरी कात म्हशीच्या दुधांत उगाळून लावणें हा घरगुती उपायहि उत्तम आहे.  साबणानें कान धुवू नये कारण तो अधिकच चिडतो.  पौष्टिक व स्निग्ध अन्न आणि शक्ति व पुष्टिवर्धक औषधें द्यावीत.

 

रक्तग्रंथि - कानावर मार लागून अगर इजा झाली असतां रक्त सांखळून तेथें लालसर गांठ बनते.  अशी उपजत गांठ वेड्या माणसांमध्ये जन्मतः पाहण्यांत येते.  ती कानाच्या पाळीच्या आंतील बाजूस लहान अगर मोठ्या आकाराची असून बहुधां टणक परंतु कधी कधी बिलबिलीत लागणारी असते.  गांठीवरील चामडी बहुधा काळीनिळी असते पण क्वचित नेहमीप्रमाणेंहि असते.  ही गांठ हळू हळू कमी होत जाऊन नंतर नाहींशी होते; परंतु एखादे वेळी पिकते व ती फुटल्यानंतर तेथें पूर्व विकृतीचें चिन्ह दिसतें.  यावर उपचारः- थंड पट्टी अगर बर्फ ठेवावें.  पिकल्यास ती शस्त्रानें फोडावी.

    

बाह्यकर्णनलिकेस होणारे रोग - बाह्यकर्णदाह, खाजवणें, कोरणें, थंडी, थंड पाण्यांत नदी व समुद्र वगैरे ठिकाणी स्नान करणें, उष्णता व कडकी, अशक्तपणा, देवी व गोंवरादि सांथीचे ताप येऊन जाणें यांपैकी एखाद्या अगर अनेक कारणांमुळे यास आरंभ होऊन कानाचें छिद्र लाल व सुजलेलें दिसतें.  कानांत दडा बसतो. आंत ठुसठुस होते व कानांत आवाज ऐकूं येतो.  प्रथम कानांतून पाण्यासारखा नंतर चिकट व पिंवळसर स्त्राव सुरू होतो.  नंतर कानांत, पापुद्रे जमतात व ते कुजल्यामुळें त्यांस दुर्गंधि येते व कानांत पिचकारी मारिली असतां त्या पाण्याबरोबर ते पापुद्रे सुटून येतात.  या पापुद्रयाखालील त्वचा लाल व दाहयुक्त असते.  एखादेवेळी दाहामुळें कानाच्या पडद्यास छिद्रहि पडतें.  कानांत वेदना चालू असतात व खाण्यापिण्यामुळें जबडा हालून अगर कानाची पाळी दाबल्यानें ती वेदना असह्य होते, ज्वरहि अमळ असतोच.  उपचारः- अगदी आरंभीं थंड पाण्याची पट्टी ठेवावी.  छिद्राच्या मुखाशीं एखाद दुसरी जळू लावावी अगर शेकावें.  कान वाहूं लागल्याबरोबर त्यांत कोमट बोरिक अॅसिडच्या धावनाचे थेंब घालावेत; बरें न वाटल्यास डॉक्टराकडून योग्य उपचार करावे.  या रोगानंतर कान फार दिवस वाहण्याचें व बहिरेपण येण्याचें भय नसतें.

    

बारीक गळवें - उष्ण प्रकृति, पंडुरोग, मधुमेहग्रस्त रोग्यांमध्यें गळवाच्या पुटकुळ्या एकाएकीं उत्पन्न होऊन त्यांच्या वेदना मस्तकाकडे यत्किंचित हालचालीनें एकसारख्या होत असतात.  पुटकुळ्यामुळें बाह्यकर्णनलिकामार्ग बंद होतो व म्हणून ऐकुं येत नाही व लालीहि नसते.  त्या पुटकुळ्या गळवाच्या असतात व त्यांनां स्पर्शहि सहन होत नाहीं.  नंतर ती गळवें फुटतात व वेदना कमी होते खरी, परंतु एकामागून दुसरें अशीं अनेक गळवें आणि वेदना हा क्रम कांही दिवस चालतो.  निद्रानाशामुळें व वेदनातिशयामुळें रोग्यास जीव नकोसा होऊन जातो.  याच्यावर उपचार म्हणजे पोटिसानें शेकणें अगर एकदोन जळवा लावणें चांगलें.  शिवाय अल्कोहोलमध्यें बोरिक अॅसिड विरवून त्याचे थेंब कानांत घालावे.  अफूचा अर्क व ग्लिसरिन यांच्या मिश्रणांत भिजविलेला बोळाहि कानांत बसवतात.  या जागेंतील कच्चें गळूं कधीं फोडूं नये; पिकल्यावर फोडावें.  शरीरप्रकृतींत जे व्यंग असेल त्यावर उपचार सुरू करावेत व झोपेसाठी औषध देत जावें.

    

कानांतीलमळ - याचीं अनेक कारणांनीं मोठी गांठ बनते व त्यामुहें अर्धवट अगर पूर्ण बहिरेपणा एकाएकींच येतो.  कानांत आवाज, चक्कर, घेरी, एकसारखी खोकल्याची ढांस अगर वेदना यांपैकी कांही लक्षणें होतात.  कानांत कोंडा फार जमून त्याची ही गांठ बनते.  उपचारः- कोमट पाण्यानें कान धुतला असतां मळ बाहेर पडतो.  तो बाहेर पडेपर्यंत कांही दिवस हें धुणें चालू ठेवलें पाहिजे.  मळ काढणार्‍या लोकांकडून मळ काढवूं नये; त्यामुळें इजा होण्याचा संभव असतो.  जरूर तर मळ मऊ होण्यासाठी डॉक्टराचें औषध घालावें.

    

अळंबी अगर छत्री या जातीची उद्भिज्ज कीड - ही कानांत गेल्यास दडे, कर्णनाद, चक्कर, भोंवळ, कानांत कंडु अगर दुःख, किंचित पाण्यासारखा स्त्राव व कर्णपथामध्यें सुटून पडलेले पापुद्रे ही मुख्य लक्षणें होतात.  टिपकागद भिजून त्यावर काळेपिवळे डाग पडावे तसे हे पापुद्रे दिसतात.  त्या खालील त्वचा लाल अगर रक्ताळलेली असते.  यावर उपचारः क्लोरिनेटेड लाइम अगर हायपोसल्फेट ऑफ सोडा या औषधांच्या द्रवाने हा रोग त्वरित बरा होतो.  या औषधांनीं पिचकारीच्या साह्यानें कान धुवावा.

    

भरीव व भुसभुशीत प्रकारच्या अस्थिग्रंथीः- पहिल्या प्रकारच्या ग्रंथी शस्त्रवैद्याकडून शस्त्रानें कापून काढवाव्या.  दुसर्‍या प्रकारच्या गांठी चिमट्यांत धरून काढतां येतात.  असल्या गांठी एक अगर अनेक असतात.  श्लेष्मलग्रंथि वगैरे अनेक इतर रोग कानास होतात पण ते येथें दिले नाहींत.

    

कर्णपेटिकेवरील अगरमध्य कर्णाचे रोग - या रोगांचे ज्ञान अवगत असणें फार अगत्याचें आहे.  घशांत, कानांत, नाकांत अतिशय सर्दीमुळे अगर भयंकर सांथीचा ज्वर येऊन गेल्यावर किंवा नदी अगर समुद्रस्नानामुळें थंडी होऊन या रोगास प्रारंभ होतो.  मस्तक जड होऊन त्यांत ठुसठुसल्यासारखें होते व नंतर शस्त्र भोंसकल्यासारख्या वेदना सुरू होतात.  कर्णनाद, भोंवळ व बहिरेपणा, व कमी अगर अधिक ज्वर हीं लक्षणें असतात.  कानाचा पडदा प्रथम लाल नसतो पण नंतर एके ठिकाणीं लाल रेषा दिसण्यास आरंभ होऊन नंतर ही लाली पडद्यावर सर्व ठिकाणीं पसरते.  आणि त्यावर पुटकुळ्या व बारीक गळवें दिसतात.  नंतर तेथून पांढरे पापुद्रे सुटून बाहेर येतात व पडदा सुजला असें दिसतें.  कारण त्याच्या मागें मध्यकर्ण नामक बारीक व चौकोनी पोकळी असून सूज व दाहामुळें ती स्त्रावानें भरलेली असते.  कर्णकंठान्वयी नलिकेचें छिद्र बंद होतें.  कांही दिवसानंतर दाहशमन होऊन सर्व लक्षणें कमी होतात, नाहीं तर पडदा फुटतो व पू कर्णनलिकेवाटे वाहूं लागतो.  यास उपचारः - रोग्यास अगदी निजवून ठेवावा.  रोग सौम्य असल्यास अंमळ हिंडलें तरी चालेल.  एक रेचक चार पांच जुलाब होतील असें घ्यावें व घशांतील सर्दीचें स्तंभन होईल अशा प्रकारचें गुळण्या करण्याचें औषध घ्यावें.  वेदना फार असल्यास एक अगर दोन जळवा कानाच्या भोंकाजवळ लावाव्या.  थंड पट्टी अगदी ठेऊं नये.  शेकणें रोग्यास मानवतें व आवडतेंहि.  कोमट पाण्याच्या पिचकार्‍या कानांत हळूहळू माराव्या.  पडदा फुगला असल्यास शस्त्रवैद्याकडून तो चिरावा.  कानाच्या मागे एक हाडाचें टेंगूळ असतें तेथें वेदना असतील तर तेथेंहि जळवा लावाव्या.  नाहीं तर कर्णमूळनामक भयंकर रोगास आरंभ होतो.  यानंतर रोगजंतुनाशक बोरिक अॅसिडादि औषधांनी कान धूत जावा व मध्यकर्ण पूरहित होईल असें करावें.  नंतर कानांत बोरिक अॅसिड फुंकून घालावें आणि वर कापसाचा बोळा बसवावा.  कानांतून पू येत नसला व पाण्यासारखाच स्त्राव असला तर पडदा फुटला नाहीं असें समजावें व जरी पडदा फुटला तरी तें छिद्र मध्यकर्ण कोरडा राहिला असतां पूर्ण बरें होतें व बहिरेपण येत नाहीं.  मध्यकर्णांतील पू अगर पाणी बाहेर पडण्यासाठी रोग्यानें कान धुतेवेळी व नंतर कांही जोराने उछवास करावे.

    

वरील रोग योग्य उपचाराच्या अभावीं कायमचा व जुनाट होऊन बसतो.  पडदा पाहिला असतां तो जाड व कांही ठिकाणीं पुवामुळें व पापुद्रयामुळें पिंवळा व कांहीं ठिकाणीं सुजेमुळें लाल दिसतो.  कोठें तरी लहान अगर मोंठें व कडा रेखीव असलेलें पडद्यास पडलेलें छिद्र दिसतें.  हें छिद्र मोठें असल्यास पडद्यापलीकडील मध्यकर्णातील अंतरंग सुजेच्या कमी जास्तपणाप्रमाणें गुलाबी रंगाचें अगर लाल असलेलें दिसतें.  फार बारीक असल्यास छिद्र दिसत नाहीं पण नाक व तोंड बंद करून उछास करण्याचा प्रयत्‍न केला तर कानावाटे आवाज, बुडबुडे व हवा जाणें इत्यादि प्रकार अनुभवास येतात.  बहिरेपण कमी जास्त प्रमाणांत व त्याचप्रमाणें चक्कर घेरी ही असतेच.  या जुनाट प्रकारच्या कर्णस्त्रावापासून नानाप्रकारची रोगपरंपरा व दुष्परिणाम होतात.  त्यापैकी एखाद्या संकटांत रोगी सांपडण्याचा संभव असतो.  त्यांचा नामनिर्देश व त्रोटक वर्णन पुढें केलें जाईल.  यास उपचारः- एकंदर शरीरप्रकृति सुधारावी.  कानांची स्वच्छता अतिशय राखावी.  कानांतील पू व कोंड्याच्या खपल्या पिचकारीनें राज धुवून काढाव्या व कान कोरडा करून त्यांत बोरिक अॅसिड फुंकून घालावें.  हें न कंटाळतां बरेच दिवस केलें पाहिजे.  त्यानें गुण न वाटल्यास बदलून दुसरी औषधें घालावी.  छिद्र मोठें असल्यास त्याचें आकुंचन होऊन तें लहान करण्याचा यत्‍न कांही उपचारांनी करावा.  स्त्राव बंद झाला व बहिरेपण राहिलें तर कृत्रिम पडदा बसवावा.  एक लांबोडा कापसाचा वळकटीप्रमाणें बारीक बोळा कानांत बारीक चिमट्यानें बसविला असतां त्याचा पडद्याप्रमाणें ध्वनिवाहनाच्या कामी उपयोग होतो.  अगर दुसरा प्रकार कृत्रिम प्रकारच्या चकत्या निरनिराळ्या कारखानदारांनी तयार केलेल्या विकत मिळतात; त्या चिमट्यानें बसवणें. चकतीचा उपयोग कोणास होतो व कोणास होत नाही.  कोणास उपयोग होतो परंतु ती चकती कानास फार खुपते व कोणास खुपत नाही.  तरी गरजूंनी त्याची उपयुक्तता अनुभव घेऊनच ठरविली पाहिजे.  या जुनाट कर्णस्त्रावापासून जी अनर्थकारक रोगपरंपरा उद्भवण्याचा संभव असतो म्हणून मागें सांगितलें तें संक्षिप्‍त रोगवर्णन येणेंप्रमाणेः - श्लेष्मलग्रंथि उत्पन्न होतात व त्या जाळून, उपटून, खरडून अगर फांसांत पकडून अगर ओढून अगर विजेच्या पेटीनें जाळून काढतात व त्याचें मूळ नष्ट होईल असें औषध तेथें लावतात.

कर्णमूळ - यांत कानाच्या मागे हाडाचें टेंगूळ आहे; तें सुजण्यास आरंभ होतो.  ही सूज उपचारांनी कमी होते.  उपचार नीट न झाल्यास या हाडावर गळूं होतें.  त्यांतील पू मानेमध्यें पसरतो;  अगर कानामागें तें गळूं फुटतें; किंवा हें गळूं वर मस्तकाच्या कवटींत जाऊन फुटतें; कारण तेथें पू जाण्याजोगा मार्ग त्या हाडांत आहे.  मस्तकांत हें गळूं फुटल्यास रोगी दगावण्याची फार भीति आहे.  कारण ही रोगावस्था शस्त्रप्रयोगामुळें बरी होण्यासारखी परंतु कष्टसाध्य आहे.  या रोगांत पोटीस, शेक, जळवा, लवकर गळूं फोडून पुवास बाहेर वाट करून देणें हे उपचार करावे वे गळूं कापल्यानंतरहि शेकणें सुरू ठेवावें.

    

अस्थिव्रण - बाह्यकर्णनलिकेचा मागील भाग, मध्यकर्णाचा वरील भाग, अगर कानामागील हाडाचें टेंगूळ हें अस्थिमय असल्यामुळें दीर्घकालीन स्त्रावामुळें हाडें कुजून तेथें हाडीव्रण होतो.  मध्यकर्णाच्या वरून चेहर्‍याकडे जाणार्‍या व चेहरा प्रफुल्लित आणि चलन करणार्‍या मज्जानाडीची खराबी झाल्यामुळें अर्धांगवायूच्या रोग्याचा चेहरा जसा अर्थशून्य व बावळट दिसतो तसा रोग्याचा अर्धा चेहरा दिसतो.  यास उपचारः- शस्त्रवैद्याकडून सुधारणा होण्याजोगी स्थिति असल्यास करावी मस्तिष्कावरणदाह म्हणजे मेंदूच्या भोंवताली वेष्टन असतें त्याचा दाह, मस्तकशिरादाह व जंतुदूषित रक्तवाहिन्यात्मक ज्वर हे तीनहि रोग शस्त्रक्रियेनेंहि कष्टसाध्य आहेत.  येणेंप्रमाणें ही रोगपरंपरा फुटलेला कान बरा करण्याची हयगय केल्यामुळें संभवते.

    

पाण्यासारखा दीर्घकालीन स्त्राव - फिरंगोपदंश, संधिवातपीडित रोगी.  फार दिवस कोयनेल घेणारे यांनां हा रोग झालेला पहाण्यांत येतो.  हा बरा होण्यास वरील स्त्रावयुक्त रोगापेक्षां त्रासदायक असतो.  याचीं लक्षणें स्त्रावयुक्तरोगाप्रमाणेंच असतात.

    

अंतस्थकर्णरोग : - कानाच्या या भागामध्यें कर्णमज्जानाडीचे सूक्ष्म तंतू असून त्यांच्या चमत्कारिक रचनेमुळें ध्वनीचें संवेदन मेंदूस होतें.  या भागांतच अर्धचक्राकृति अस्थींचे बारीक बोगदे असतात.  यांविषयीं माहिती पूर्वी फारशी नव्हती ती आतां अधिक झाली आहे.  येथें रोग होणें म्हणजे वर सांगितलेल्या कर्णमज्जानाडीच्या ध्वनिसंवेदनक्रियेचा बिघाड होणें म्हणजे अर्थातच बहुधा बरा न होण्यासारखा बहिरेपणा येणें.  याची कारणे बहुशः  बाह्यकर्ण व मध्यकर्ण येथें होणारे वरील रोग, हयगयीमुळें अगर त्याच्या तीव्रतेमुळें अंतस्थ कर्णापर्यंत ते पसरत जाणें हें होय.  शिवाय अशक्तता, मधुमेह, पंडुरोग, सांथीचे भयंकर ताप, फिरंगोपदंश किंवा मस्तकांतील धमन्यांनां विस्तरणरोग होणें अथवा तोफांचे आवाज फार जवळून ऐकणें किंवा कोयनेल फार घेणें हींहि कारणें होत.

    

भोंवळ - वर सांगितलेल्या अर्धचक्राकार बोगद्यामध्ये रक्तसंचय होऊन त्यामुळें पूर्वी बहिरेपण नसलेल्या माणसास एकाएकीं मोठा कर्णनाद ऐकूं येणें व झोंक जाऊन पडेल इतकी मोठी भोंवळ येणें ही लक्षणें होतात.  नंतर मळमळूं लागून वांति होते व चक्कर येऊन अंगास थंडगार घाम सुटतो.  जरा बरें वाटल्यावर आपण एका कानानें बहिरे आहोंत हें त्याला कळून येतें.  कालांतरानें चक्कर कमी होते; परंतु कर्णनाद व बहिरेपण कायम रहाते.  फार बहिरेपण असल्यास कर्णनादहि पुढें कमी होतो.  यावर उपचार - क्विनाईन, पोटॅशियम ब्रोमाइड टोंचून पैलोकार्पीन नैट्रेट हें औषध घालणें व विजेची पेटी लावणें हे केलें असतां त्यांचा थोडाबहुत उपयोग होतो.

    

कर्णशूळ - हे लक्षण कानाच्या बर्‍याच रोगांमध्यें असतें.  परंतु कर्णरोग नसूनहि ज्याप्रमाणें कपाळशूळ, माथेशूळ, दंतशूळ त्याप्रमाणें शुद्ध मज्जातंतूंची दुर्बलतादर्शक अशा प्रकारचा निवळ कर्णशूळ रोग स्वतंत्रपणें आढळतो व त्यास उपचार इतर प्रकारच्या शूळाप्रमाणें करून शिवाय कानामागें पलिस्तर मारून कानांत कोकेनचे थेंब घातल्यानें शूळ थांबतो.

    

कानांतून रक्तस्त्राव - पुढील कारणांमुळें कानांतून रक्त येतें.  (१) मस्तकाच्या कवटीच्या तळाचा दुखापतीनें भंग होणें; व त्यामुळे मध्यकर्ण दुखावणें. (२) कान कोरल्यामुळें बाह्यकर्णनलिकेस होणार्‍या इजा, जखमा व व्रण. (३) श्लेष्मलग्रंथि, गळवें वगैरे कानांत होणें. (४) कानशिलांतील टणक हाडास व्रण होऊन मध्यकर्ण बिघडणें व नासणें अगर कुजणें.  (५) कानाचा पडदा फुटणें.  हा प्रकार खोल दरी, समुद्राच्या तळीं अगर उंच पर्वतारोहणाच्या वेळीं होण्याचा संभव असतो.  (६) अपवादात्मकपणें कानांतून स्त्रियांचें आर्तव वाहिल्याचीं उदाहरणें आढळतात.

    

आयुर्वेदीयविवेचन :- कानाच्या रोगांसंबंधी आयुर्वेदीय विवेचन येणेंप्रमाणे -

    निदान - पडसें, पाण्यांत डुंबणे व कान कोरणें यांनी, तसेंच शब्दाचा मिथ्यायोग झाल्यानें किंवा दुसर्‍या कांही प्रकोपक कारणांनी वायु कुपित होऊन कानांतील शिरांत जाऊन कानांत जोराचा शूल उत्पन्न करतो.  त्यानें अर्धशिशी दुखते, कान स्तब्ध होतो, थंड पदार्थांचा तिटकारा येतो.  फार दिवसांनी कान पिकतो व पिकला म्हणजे त्यांतून लस वहाते.  एकदम कानाला दडे बसतात, व आंतून कांही झरझरतें असें वाटतें.

    पित्तकोपानें शूल, दाह, चुरचुर, थंड पदार्थाची इच्छा, सूज, ताप, कान लवकर पिकून पिंवळट लस वहाणें आणि ती ज्या ज्या ठिकाणीं लागेल ती ती जागा पिकणें हे विकार होतात.

    कफानें डोकें, हनवटी, व मान ही जड होतात.  कानांत ठणका कमी असतो, कंड येते, सूज असते व उष्णाची इच्छा असून पिकल्यावर त्यांतून पांढरा व दाट पू वहातो.

    

अभिघातादिकांनी दूषित झालेल्या रक्तापासून पित्तकोपासारखे किंवा त्याहून किंचित अधिक असे विकार होतात.

    तिन्ही दोषांच्या प्रकोपापासून कानांत शूळ, सूज, ताप, तीव्र कळा, कधी थंड कधी उष्ण, पदार्थांची इच्छा, कानास जडत्व ही लक्षणें होतात.  आणि तो पिकला म्हणजें त्यांतून पांढरा, काळा, तांबुस व दाट असा पू येतो.

    

शब्दवाहक शिरांत वायु दृष्ट झाला असतां कारणांवांचून वरचेवर अनेक प्रकारचे शब्द ऐकू येतात.  त्यास कर्णनाद म्हणतात.

    वायूस कफाची जोड मिळाली असतां किंवा कर्णनादाची उपेक्षा केली असतां मोठ्यानें बोललें तरी ऐकू येण्यास कष्ट पडतात.  आणि पुढें काहीं दिवसांनी मुळीच ऐकू येईनासें होतें.  म्हणजें बधिरता पूर्ण येते.  वायूनें कफ शोषला जाऊन कान चिकटतो.  कान जड होतो व चोंदतो त्यास प्रतिनाद म्हणतात.

    कानांत नेहमीं खाज येते त्यास कर्णकंडू व फार दिवस सूज रहाते त्यास कर्णशोफ म्हणतात.

    पित्तानें कफाचा विदाह होऊन कानांत दाट व दुर्गंधीयुक्त अशी पुष्कळशी लस होते आणि ठणका होतो, किंवा क्वचित तो नसतोहि.  त्यास पूतिकर्ण म्हणतात.

    वातादि दोषांनी कान दूषित होऊन त्यांत कृमी होतात.  व ते कान खातात.  आणि मांस व रक्त यांचा क्लेद होऊन त्यापासून फार तीव्र ठणका लागतो त्यास कृमिकर्ण म्हणतात.

    

कान कारेल्यानें क्षत होऊन कानांत विद्रधी होतो त्यास कर्णविद्रधि म्हणतात.

नेत्रार्श व नेत्रार्बुदाप्रमाणें कानांत सूज येते तीस कर्णार्श व कर्णार्बुद म्हणतात.  या विकारांत ठणका, कान सडून दुर्गंध येणें व बहिरेपणा हीं लक्षणें होतात.

    वायूनें कानाचें छिद्र आंत संकुचित झालें असतां त्यास कूचिकर्णक म्हणतात.

    

कानाच्या आंतल्या अंगास एक किंवा अनेक न दुखणारे किंवा दुखणारे पिंपळीएवढे टणक मोड येतात त्यास कर्णपिप्पली म्हणतात.

    तिन्ही दोषांपासून त्वचेच्याच रंगाची दुखणारी व ताठर अशी सूज येते तीस विदारिका म्हणतात.  तिची उपेक्षा केली असतां ती पिकून तिच्यांतून शिरशेलासारखा स्त्राव होतो व व्रण भरून येण्यास फार त्रास पडतो; आणि भरला तर कनाचें छिद्र खचित आकुंचित होतें; कानाच्या शिरांतील वायु कानाची पाळ शुष्क करतो.  त्यास पालिशोष म्हणतात.

    वायूनें कानाची पाळ टणक व बारीक तारेसारखी होते, त्यास तंत्रिका म्हणतात.  मूल किंवा सुकुमार माणसाचा नाजुक कान टोंचून कांही दिवस सोडून पुन्हां एकदम वाढवूं लागले असतां पाळी सुजते, ठणकते, सूज तांबूस असते व तिच्यावर चिरा असतात.  हा विकार वायूपासून होतो व यास परिपोट म्हणतात.

    

फार जड दागिन्यांच्या भारानें किंवा दुसर्‍या कांहीं अशाच कारणांनीं रक्त व पित्त कुपित होऊन कानास काळसर रंगाची सूज येते.  त्यास उत्पात म्हणतात.  यांत कळ, दाह, पाक, फोड, पुळ्या, लाली, चुरचुर व लस हे विकार होतात.

    वायु व कफ यांपासून सगळ्या पाळीभर सूज येते.  ती दुखत नाहीं.  ती स्थिर, ताठलेली व त्वचेच्या वर्णाची असते, आणि तीस खाज सुटते.  या विकारास उन्मथ म्हणतात    

कान बरोबर न टोंचला जाऊन वाढवू लागलें असतां तिन्ही दोष कुपित होऊन त्यांपासून कान सुजतो, कंड सुटते, दाह होतो, पिकतो व ठणकतो.  या विकारास दुःखवर्धन असें म्हणतात.  कफ, रक्त व कृमी यांपासून पाळीवर लेह्य किंवा लेहिका नांवाच्या बारीक पुळ्या उठतात.  त्यात कंड, लस व वेदना हीं असतात.  त्यांची हयगय केली असतां त्या पाळ खातात.  कर्णपिप्पली, त्रिदोषात्मक शूलविदारिका, व कूचिकर्णक हे रोग असाध्य आहेत.  तंत्रिकायाप्य आहे.  आणि बाकीचे साध्य आहेत.  याप्रमाणें कानाचे एकंदर २५ रोग आहेत.

   

चिकित्सा - वातजन्य कर्णशूळावर : - मांसरसाबरोबर जेऊन रात्रीं वातनाशक औषधांनी सिद्ध केलेलें तूप प्यावें. नंतर कान शेकून मुळ्याचा रस कानांत घालावा.  कान दुखत असतांना डोक्यावरून स्नान करूं नये आणि दिवसा देखील थंड पाणी पिऊं नये.  रात्री तर थंड पाणी पिऊंच नये.

    

पित्तशूळावर :- खडीसाखर घालून तूप प्यावें.  त्यानें कोठा स्त्रिग्ध झाला म्हणजे रेचक घ्यावें आणि जेष्ठमध, द्राक्षें यांच्या रसानें युक्त अंगावरचें दूध कानांत घालावें.  जेष्ठमध, मंजिष्ठ वगैरे पित्तशामक औषधांचा लेप कानासभोंवती करावा.  कफजन्य शूळावर पिंपळीनें सिद्ध केलेल्या तुपानें कोठा स्त्रिग्ध करून वांती करवावी.  आणि कफनाशक धूम्र, नस्य, गुळणे व शेकणें हे उपाय करावे.  लसूण, आलें यांचे रस कानांत घालावे.  रक्तजन्य कर्णशूळावर पित्तज शूळासारखी चिकित्सा करावी आणि लवकर शीर तोडावी.  कान पिकून पू वाहूं लागला म्हणजे धूम्रपान, गुळणे, नस्यें, नाडीव्रणाचीं औषधें व दुष्ट व्रणाची औषधें योजावीं.  चिकटलेला कान दोन वेळा धुवून कापसाच्या बोळ्याने पुसून काढून गुग्गुळाची धुरी देऊन कानांत मध घालावा  मग कफनाशक औषधांनी तयार केलेल्या कापसाच्या वाती कानांत घालाव्या अथवा चूर्णे कानांत घालावी.  कर्णनाद व बधिरता यांवर वातशूळावरची चिकित्सा करावी.  आणि त्यांत कफाची जोड असल्यास प्रथम वमनादिक द्यावें.  क्षारतेल (अष्टांगहृदय उत्तरस्थान अ.८) हें सर्व कर्णरोगनाशक आहे.  कान मेहरी आल्यासारखे सुन्न झाले असतां रक्त काढावें.  सूज व क्लेद असून कमी ऐकूं येत असल्यास वमन द्यावें.  मुलांचा, म्हातार्‍यांचा व पुष्कळ दिवसांचा बहिरेपणा असाध्य समजून सोडून द्यावा.  प्रतिवाह रोगास कानांत तेल घालून व शेकून मळ नरम झाला म्हणजे तो कानकोरण्यानें काढून कानांत तेल घालावें.  किंवा सैंधव व मध यांसह महाळुंगाचा रस घालावा.  मळ काढल्यानें कानांत रूक्षता उत्पन्न झाल्यास तुपाची निवळी घालावी.

    

मळानें कान अगदी भरून गेला असला तरीहि याचप्रमाणें करावें.  कंड असल्यास कफन्न नस्यादिक द्यावें.  आणि सुजेवर तें करून शिवाय तिखट व उष्ण औषधांचा लेप करावा.  पूतिकर्ण व कृमिकर्ण यांवर कर्णस्त्रावावरील औषध करावें.  आणि कृमिकर्णावर विशेषतः  शिरसेल कानांत घालावें. कर्णविद्रधीवर पूर्वी वमन देऊन विद्रधीवरची चिकित्सा करावी.  क्षतविद्रधीवर पित्तजन्य कर्णशूळावरची चिकित्सा करावी.  कर्णार्श व कर्णार्बुद यांवर नासार्श व नासार्बुदाप्रमाणें चिकित्सा करावी.

कर्णविदारिका अपक्व असतां तिची चिकित्सा दोषानुरोधानें कर्णविद्रधीप्रमाणें करावी.  पालीशोषावर वातजन्य कर्णशूळाप्रमाणें नस्यलेप व स्वेद करावे. नंतर नेहमी पुष्टिकारक असे स्नेह तीवर चोळून जिरवावे.  पाळी फारच क्षीण झाली असल्यास तितकी कापून काढून बाकीची डकवून नंतर तिचें पोषण करावें.  तंत्रिकांहि याच उपायानें वाढूं न देतां तशीच राखावी आणि परिपोटावरहि हीच चिकित्सा करावी.  उत्पातावर जळवा लावून रक्त काढावें आणि वर थंड औषधांचा लेप करावा.  रोगानें कान तुटला असल्यास रोग्यास रेचक वैगरे देऊन शुद्ध करून त्याच्या कानाच्या तुटलेल्या बाजू कापून त्यांत शुद्ध रक्त आल्यावर त्या एकमेकांस जुळवून त्या जागेस योग्य बंध बांधावा.  अपघातानें कान तुटला असल्यास तो जुळवून बंध बांधून नंतर रेचक वगैरे देऊन शुद्ध करावें.

  तुटका कान जुळवावयाचा असल्यास पुरुषांच्या शेंडीस व बायकांच्या केंसास गाठ मारून  त्या तुटक्या तोंडांचें छेदन व लेखन करून त्याचा सांधा जुळवून उंचट किंवा खालपट न करता जागच्याजागी सारखा बसवून मघ, तूप लावून वर कापसाचा बोळा बसवून सुतानें फार घट्ट नव्हे व फार सैल नव्हे असें बांधून वर रक्त बंद करणार्‍या औषधांची पूड टाकावी, आणि व्रणाचे उपचार करावे.  नंतर सात दिवसांनी वर तेल सोडून हळू हळू बोळा काढावा.  कान चांगला भरून आला, वर केस आले, सांधा चांगला जडला आणि तो सारखा कठिण, सुरेख व लाल झाला म्हणजे हळु हळू कान वाढवावा.