बारामती - बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू



बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बारामतीत समोर आली आहे. या प्रकरणी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे राज्यात खळबळ उडाली असताना बनावट औषध रुग्णांच्या जीवावर उठत असल्याचं समोर आलं आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर औषध बनवून विकणाऱ्या चौघांना अटक केली होती. या चौघांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यानंतर या बनावट औषधामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणातील चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.


बारामतीत चौघांना सापळा रचून अटक

बारामतीत दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत आणि शंकर भिसे या चौघांनी बनावट रेमडिसीव्हर इंजेक्शन बनवून त्याची विक्री केली होती. बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत या चौघांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एकाचा या बनावट औषधामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. या चौघांवर पोलिसांनी कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.


चेंबुरमधील महिलेची फसवणूक

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच दुसरीकडे या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. मुंबईतील चेंबूर भागातील एका महिलेने ऑनलाईन रेमडेसिव्हीर मागवले असता तिला दुसरेच इंजेक्शन देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

एका ऑनलाईन वेबसाईटवर रेमडेसिव्हीर उपलब्ध असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर तिने त्या इंजेक्शनची ऑर्डर दिल्यानंतर 18 हजार रुपये दिले. मात्र तिला दुसरेच इंजेक्शन देण्यात आल्याची घटना समोर आली. यानंतर त्या महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी याबाबतचा वेगाने तपास करून 24 तासात आरोपी रुपेश गुप्ता याला पालघरच्या वाळीव येथून अटक केली. या आरोपीने याआधी दादर, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली या ठिकाणी 7 जणांना तब्बल 29 इंजेक्शन विकल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरात दोन नर्सच्या पतींना अटक

तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात नकली रेमडेसिव्हीरचा काळाबाजार प्रकरणी कारवाई सुरु आहे. या प्रकरणी एका रुग्णालयातील दोन नर्सच्या पतींना अटक करण्यात आली आहे. नागपुरात गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. या रॅकेटमधील तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.