मेटेंच्या २०० खाटांच्या कोविड केअरची उभारणी पूर्णत्वाकडे



बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा वेग वाढतच असल्याने सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची सोय व्हावी, यासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी स्वखर्चातून २०० खाटांच्या कोविड केअर सेंटरची उभारणी सुरु केली असून काम पूर्णत्वाकडे आले आहे. 

शहरानजीकच्या खापर पांगरी रोडवरील जिजाऊ मांसाहेब पब्लिक स्कुलच्या इमारतीमध्ये पुढच्या आठवड्यात सदर कोविड केअर सेंटर कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज हजारांच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. 

मोठी दवाखाने रुग्णांनी खचाखच भरले असून कोविड केअर सेंटरमध्येही जागा अपूऱ्या पडत आहेत. बीड तालुक्यात रोजच तीनशेंच्या घरात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण येत असून शहरातील इतर शासकीय कोविड केअर सेंटर देखील रुग्णांनी भरले आहेत. 

त्यामुळे रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांची सोय व्हावी यासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून दोनशे खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणीच निर्णय घेतला.