Beed Breaking News अंबाजोगाईत जावयाकडून सासूची हत्या

 



जिल्ह्यातील केज तालुक्यात साळेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. साळेगाव येथे महामार्गावर चाळीस वर्षीय सासूचा तिच्या जावायानेच खून केला. सासूच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने तिच्या मानेवर आणि हातावर जावयाने सपासप वार केले. दरम्यान, या महिलेसोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी मात्र पसार झाला आहे. 



धायगुडा पिंपळा तालुका अंबाजोगाई येथील लोचना उर्फ सुलोचना माणिक धायगुडे आणि तिच्या नात्यातील अंकुश दिलीप धायगुडे हे लोचना यांचा जावई अमोल इंगळे यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु, त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे ते घरी परतत होते. घरी जात असताना साळेगाव येथील केज-कळंब महामार्गावरील संताजी हॉटेल समोर दोघेही थांबले. तिथेच त्यांचा जावई अमोल त्यांना भेटण्यासाठी आला. यावेळी या तिघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर अंकुश धायगुडे यांच्या मोटरसायकलवर बसून लोचना धायगुडे केज मार्गे अंबाजोगाईकडे जाण्यास निघाल्या. परंतु, संतापलेल्या जावयानं सासूच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार कोयत्यानं तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या हातावर वार केले. या झटापटीत सासू मोटरसायकलवरुन खाली पडली. त्यानंतर संतापलेल्या जावयानं तिच्या मानेवर धारदार कोयत्यानं वार केले. 

दरम्यान, संतापलेल्या जावयानं कोयत्यानं वार केल्यामुळं सासूचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिच्यासोबत असणारी व्यक्ती या मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. या व्यक्तीवर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हत्या केल्यानंतर मृत महिलेचा जावई अमोल इंगळे मात्र घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मृत महिला आणि तिच्यासोबतची व्यक्ती ज्या मोटरसायकलवरुन आले होते. तिच गाडी घेऊन आरोपीनं घटनास्थळावरुन पोबारा केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचाही शोध सुरु आहे.