पुणे पोलिस संजय राठोडांचीही चौकशी करणार .....



पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तब्बल 12 दिवसानंतर मोठं विधान केलं आहे. आवश्यकता असल्यास वन मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी करण्यात येईल, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (we can interrogate sanjay rathod in pooja chavan suicide case says pune police)

पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना हे विधान केलं आहे. आवश्यकता असल्यास पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांची चौकशी करण्यात येईल. आम्ही या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास करत आहोत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.


राठोड समोर येणार?

पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव

घेऊन त्यांच्यावर आरोप केले आहेत. तरीही गेल्या 12 दिवसांपासून राठोड मीडियासमोर आलेले नाहीत. त्यांनी आपली बाजूही मांडलेली नाही. मात्र, आता पुणे पोलिसांनी त्यांच्या चौकशीचे सुतोवाच केल्याने राठोड सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.


गुन्हा दाखल नाही

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला 12 दिवस झाले तरी पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच या प्रकरणी काल अरुण राठोड नावाच्या तरुणाला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. पण पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळल्याने या प्रकरणी पोलीस कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेत याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.


ऑडिओ क्लिपमधून उलगडा ?

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधित आहेत का, याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली, ना पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. (we can interrogate sanjay rathod in pooja chavan suicide case says pune police)