‘पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी आपल्या कृत्याची कबुली द्यावी’
पोहरादेवी गडावर गेल्यानंतर संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण हिच्याबाबत केलेल्या आपल्या कृत्याची कबुली द्यावी, असे वक्तव्य शांताबाई राठोड यांनी केले. शांताबाई राठोड या पूजा चव्हाण हित्या चुलत आजी आहेत. (Sanjay Rathod should give his confession about Pooja Chavan)
त्या मंगळवारी बीड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर गेल्यानंतर सत्य बोलावे. त्यांनी खोटं बोलून बंजारा समाजाची दिशाभूल करु नये. त्यांनी आपल्या कृत्याची कबुली द्यायला पाहिजे, असे शांताबाई राठोड यांनी म्हटले. याशिवाय, 7 ते 21 फेब्रुवारीपर्यंतची परळी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यापूर्वी शांताबाई राठोड यांनी संजय राठोड यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला होता. पूजा चव्हाण हिला गर्भपात झाल्यानंतर यवतमाळमध्येच ठार मारण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या फ्लॅटवर नेऊन तिला तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलण्यात आले, असा दावाही शांताबाई राठोड यांनी केला होता.
‘अरुण राठोडची नार्को चाचणी करा, पूजाच्या कुटुंबीयांचे कॉल डिटेल्स तपासा’
शांताबाई राठोड यांनी यापूर्वीही पूजा चव्हाण प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) अरुण राठोडची नार्को चाचणी करा, अशी मागणी पूजाच्या चुलत आजीने केली आहे. पूजाच्या कुटुंबाीयांचे मोबाईल डिटेल्स तपासा, यात कोण दबाव टाकतोय स्पष्ट होईल. पूजाला न्याय मिळाला पाहिजे, दोषी कोणीही असो. अरुण राठोड किंवा कोणीही, त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे शांताबाई राठोड यांनी म्हटले होते.
पूजाच्या घरात मद्याच्या बॉटल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी पूजाच्या घराची तपासणी केली असता तिच्या घरात मद्याच्या 4 बाटल्या सापडल्या. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरून घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, पूजाने मद्य प्रशान केले होते की नाही या बाबतचा अद्याप उलगडा झालेला नाही. परंतु, मद्याच्या बाटल्या सापडल्याने पूजाचा मद्याच्या नशेत गॅलरीतून तोल तर गेला नाही ना? किंवा तिला नशेत कुणी ढकलून तर दिले नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी यबाबतच्या कोणत्याही बाबींना दुजोरा दिला नाही, मात्र त्या दिशेने तपास सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा