मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.. Blog Post by Dr.Ashwini Alpesh Naik



स्मिता लग्न होऊन खेडेगावातून मुंबईला आली. घरच्या परिस्थितीमुळे तीच शिक्षण दहावी पर्यंतच झालं होतं. तिचा नवरा राजेश बारावी शिकलेला. स्मिता आणि राजेश खुप समजूतदार होते. त्या दोघांच्याही त्यांच्या जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नव्हत्या. एकमेकांना समजून घेऊन आदराने आयुष्य व्यतीत करावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. राजेश एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये नोकरी करत होता. त्यांच्याकडे खुप पैसे नसेल तरी ते समाधानाने आणि मानाने जगात होते.राजेश आणि स्मिताचा संसार फुलत होता. दिवसा गणीक एकमेकांची ओढ वाढत होती. लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. ते दोघेही खूप आनंदात होते. मुली मोठ्या होत होत्या. सारे काही खुप छान सुरू होते. नुकताच त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस त्यांनी साजरा केला. सेलिब्रेशनसाठी दोघांचे ही आई वडील खास गावावरून मुंबईला आले होते. अशा प्रकारे कुटुंबीय आणि थोड्या फार मित्र मंडळींच्या उपस्थितीत एक छोटेखानी सोहळा झाला. सगळं कसं अगदी पिक्चर परफेक्ट सुरू होतं.

2020 जानेवारी महिन्यात कोरोना भारतात दाखल झाला. हळूहळू मार्च संपे पर्यंत भारत सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. इतरांप्रमाणेच राजेश आणि स्मिताला वाटले हे सारं पंधरा एक दिवसात संपेल आणि सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल. पण तसे झाले नाही. पहिला महिना राजेशचा पगार पूर्ण आला. दुसऱ्या महिन्या त्यात पन्नास टक्के कपात करण्यात आली. या अशा परिस्थिती नोकरी आहे आणि पन्नास टक्के का होईना पगार तर मिळतोय याचे त्यांना समाधान होते. बघता बघता तिसरा महिना सुध्दा उजाडला. त्याही महिन्यात पन्नास टक्के पगारच हातात आला. कंपनी कॉस्ट कटिंग मुळे लोकांना नोकरी वरून काढता असल्याची खबर अधून मधून राजेशच्या कानावर येत होती. राजेश त्यामुळे थोडा फार घाबरला होता. 'आपल्या सोबत असे झाले तर पुढे काय करायचे, पदरात दोन मुली त्यांचा सांभाळ कसा करायचा, त्यात आता त्याच्या बारावी पर्यंतच्या शिक्षणाला फारसे कोणी विचारत नाही हे सुध्दा त्याला ठाऊक होते. आणि या वयात नोकरी तरी कोण देणार'. हे सगळे विचार त्याला भेडसावू लागले. असे होऊ नये यासाठी तो सतत देवा कडे प्रार्थना करीत होता. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

रात्रीचे जेवण उरकल्यावर स्मिता आणि राजेश गप्पा मारत बसले होते. राजेशला फोन आला म्हणून तो बाल्कनीत गेला. तो पाच मिनिटांनी घरात आला आणि अगदी लहान मुलांसारख ढसा ढसा रडू लागला. स्मिताला कळेना नक्की काय झाले आहे ते. तिने राजेशला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याला पाणी आणून दिले. त्याचे अश्रु पुसले. राजेश थोडा शांत झाला आणि त्याने तिला त्याची नोकरी गेल्याचे सांगितले. स्मिता सुध्दा जागीच स्तब्ध झाली. पण तिने स्वतः ला सावरले. राजेश सर्व संपल्या सारखेच वागत होता. तिने त्याला भानावर आणले. जे झालं ते झालं पण आपण असे हरून नाही जाऊ शकत. आपल्याला आपल्या मुलींसाठी खंबीर राहायला हवे, याची तिने त्याला जाणीव करून दिली. राजेश स्मिताला म्हणाला ,आता पुढे काय करायचं. या प्रश्नाचं उत्तर तिच्या कडे सुध्दा तेव्हा नव्हते. आजची रात्र सरू द्या.. उद्या ठरवू आपण काय करायचं ते. असे म्हणून तिने ती वेळ मारून नेली. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

@momspresso

Disclaimer: The opinions expressed in this post are the personal views of the author. They do not necessarily reflect the views of Ilovebeed.com. Any omissions or errors are the author's and Momspresso does not assume any liability or responsibility for them.