माणसांना ‘बोलते ’ करणारे तज्ज्ञ हा कोर्स कुठे आहे आणि किती वर्षाचा .....


 

माणसांना ‘बोलतं’ करणारे तज्ज्ञ  हा कोर्स कुठे आहे आणि किती वर्षाचा .....

 अनेकांच्या आयुष्यात शब्द भरणारं, त्यांना बोलायला शिकवणारं नवं काम.

‘कानानं बहिरा मुका परी नाही.’-अशी एक जाहिरात पूर्वी टीव्हीवर लागायची. ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही अशा समस्येत अनेक मुलं असतात. काही तोतरं बोलतात. काही बोलताना अडखळतात. त्यामुळे आत्मविश्‍वास कमी झालेला असतो. काही जण मानसिक धक्क्यामुळे बोलू शकत नाहीत. या सगळ्याला स्पीच डिसऑर्डर म्हणतात. आणि वेळीच योग्य उपचार केले तर या प्रश्नांवर इलाज केला जाऊ शकतो. श्रवण विज्ञानाची ही शाखा त्याच शाखेत ‘बोलण्यावर’ उपचार करणार्‍या तज्ज्ञांना म्हणतात स्पीच थेरपिस्ट.

आता नव्या संदर्भात तर हळू बोलणं, जास्त भरभर बोलणं, बोलताना अं.अं. करणं या सार्‍यावर इलाज म्हणूनही स्पीच थेरपिस्टची मदत घेतली जाते.

स्पीच थेरपिस्ट कोण असतात ?

ज्यांना ऐकू कमी येतं किंवा ऐकू कमी येत असल्यानं बोलताना प्रॉब्लेम होतो. काही जण अडखळतात, बोलताना चाचरतात हे सारं कशानं होतं हे शोधून त्यावर उपचार करण्याचं काम हे स्पीच थेरपिस्ट करतात. याशिवाय आपल्या आवाजाचा दर्जा कसा सुधारायचा, विशिष्ट आवाज कसे काढायचे, विशिष्ट भाषा बोलताना काय काळजी घ्यायची, कसे उच्चार करायचे याचीही माहिती ते देतात. अनेकदा बोलून, विविध प्रश्न विचारून, विविध चाचण्यांचा आधार घेऊन, उपकरणं वापरून ते बोलण्याच्या संदर्भातले प्रश्न समजून घेऊन निदान करतात. ज्यांना अजिबातच बोलता येऊ शकत नाही त्यांना साईन लॅँग्वेज शिकवण्याचं कामही ते करतात. काही जण लीप रिडिंगही शिकवतात.

अर्थातच हे काम सोपं नाही. नुस्तं प्रोफेशनल कौशल्य उपयोगाचं नसतं तर पैशंटची काळजी, त्याला समजून घ्यायची तयारी आणि पेशन्स फार महत्त्वाचा असतो. शिकवणं, नियोजन आणि संशोधन या तिन्ही गोष्टीत गती असणंही आवश्यक असतं.

शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा उत्तम अभ्यासही आवश्यक ठरतो.

पुढे स्कोप काय?

स्पीच थेरपिस्टची गरज विविध हॉस्पिटल्स, पुनर्वसन केंद्र, शाळा, कौन्सिलिंग सेंटर्सला असते. मेंदूविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ यांनाही स्पीच थेरपिस्टची गरज भासते. या क्षेत्रात आता विविध उपचार शक्य असल्यानं मोठय़ा प्रमाणात प्रशिक्षित स्पीच थेरपिस्टची गरज भासणार आहे.

प्रशिक्षण कुठे?

१) बारावीला सायन्स घेणं त्यासाठी आवश्यक असतं. बारावीनंतर चार वर्षांचा बॅचलर्स इन स्पीच अँण्ड ऑडिओलॉजी (Bachelors in Speech and Audiology) कोर्स करता येऊ शकतो.

२) त्यासाठी राज्य आणि राष्ट्रपातळीवर होणारी प्रवेश परीक्षा मात्र द्यावी लागते.

३) याशिवाय बीएस्सी नंतर ऑडिओ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या विषयात एमएससी करता येऊ शकतं.

४) हे कोर्सेस करून तुम्ही पुनर्वसन आणि विशेष शिक्षण कौन्सिलकडे स्वत:चं नाव नोंदवू शकता. त्यासाठी अधिक माहिती या साईटवर मिळेल. http://www.rehabcouncil.nic.in/

५) इंडियन स्पीच अँण्ड हिअरिंग असोसिएशन या साईटवरही अधिक माहिती मिळू शकेल.http://www.ishaindia.org.in/ याच साईटवर देशभरातील कॉलेजेस आणि प्रवेश प्रक्रियेची माहितीही मिळू शकेल.

६) आरोग्य विज्ञान विद्यापीठात तीन वर्षांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. तसेच दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकवला जातो.

महाराष्ट्र हा कोर्स कुठे कुठे आहे 

  • अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थान, मुंबई
  • भारती विद्यापीठ पुणे