💥 कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गणेशोत्सवात प्रशासनास सहकार्य करावे



गणेशोत्सव काळात नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. गणेश मूर्ती काही दिवस अगोदरच नागरिकांनी खरेदी करावी परिणामी गर्दी टाळता आल्यास कोरोनाच्या संसर्गास अटकाव करण्यास मदत होईल. 


तरी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनास सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले.


कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत चौधरी बोलत होते. 


यावेळी खासदार  इम्तियाज जलिल, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.  


डॉ. कराड यांनी कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही, असे मत मांडले. 


खासदार जलील यांनी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट काही अटी शर्तींसह सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी,  अशी मागणी केली. 


आमदार बागडे यांनी नागरिकांमध्ये कटाक्षाने मास्क वापरणे, शारिरिक अंतर बाळगणे याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे सांगतानाच गणेशमूर्तींच्या स्टॉलला लवकर परवानगी द्यावी. 


तसेच नागरिकांनी लवकर मूर्ती खरेदी कराव्यात,  जेणेकरून शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळता येईल, यासाठी प्रशासनाने आवाहन करावे, असे सूचविले. 


पोलिस आयुक्त  प्रसाद यांनी दहीहंडी उत्सव आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस बंदोबस्त, कोरोनाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली.