वेंगुर्ला रॉक्स Vengurla Rocks
साल मला आठवत नाही, अलीकडची १० वर्षातली गोष्ट आहे. थंडीचे दिवस म्हणजे मालवणचा पर्यटनाचा हंगाम. दांडीला आम्ही रुपेश प्रभूच्या घराकडून उशिरा नाश्ता करून निघालो. फिशिंगची छोटी बोट आहे. त्यात आम्ही ५ ते ७ जण. दांडीतनं १८ किलोमीटर लाईन ऑफ साईटवर वेंगुर्ला दीपगृह (@15.9181567,73.4842107) आहे समुद्रात. वेंगुर्ल्याच्या किनाऱ्यावर दीपगृह आहे ते वेगळं. साधारण तासभर प्रवास केल्यावर आम्ही दीपगृहाजवळ पोहोचलो. इथून सर्वात जवळचा किनारा ८ किमी आहे पण जमीन दिसत नाही. चोहोबाजूला समुद्र. इतक्या खोलवर छोटी होडी फारच हलते. लाटा होडीला नाचवतात. होडी हेलकावते, पाण्यावर आपटते त्याचा आवाज होतो. भीती वाटतेय. ऊन मान भाजतंय. तशातच बोटीत बसून सुरेश बांगडे साफ करतोय. त्याची घाण हवेत भिरकावली कि सिगर्ल्स ती वरच्यावर मटकावतात.
वेंगुर्ला रॉक्स हि समुद्रातल्या टेकड्यांची एक मालिका आहे. त्यातल्या सर्वात मोठ्या आणि उंच बेटावर सध्याच दीपगृह आहे. त्याच्या ७०० मीटर ईशान्येला दुसऱ्या क्रमांकाच्या बेटावर जुनं दीपगृह आहे. ते बंद असत. या दुसऱ्या बेटावर पाकोळ्यांचं (पक्षी) राज्य आहे. दुसऱ्या बेटाच्या सव्वा चार किलोमीटर उतरेपर्यंत समुद्री खडकांची मालिका आहे. सर्वात उत्तरेला एक थोरला खडक आहे 15.932224, 73.463661. त्याच नाव देवळो (देऊळ या अर्थाने). इथल्या बहुतेक खडकांना स्वतःची नावं आहेत. तुम्ही एकदा त्यांना जवळून पाहिलंत कि किनाऱ्यावरून सुद्धा ओळखाल.
असो आम्ही लाईट हाऊसच्या बेटाजवळ आहोत. वर उंच कड्याचं बेट आणि त्यावर लाईट हाऊस. त्याच्या पूर्व बाजूला उत्तरेकडून वळसा घालून आम्ही पाठी पश्चिमेला येतो. तिथे एका सी सारख्या आकाराच्या जागी या बेटाचा धक्का आहे. धक्का म्हणजे एक दगडी आणि सिमेंटच्या पायऱ्यांची मालिका. त्या बेटावरून खाली समुद्रापर्यंत येतात. त्याचा कोण साधारण ४० अशांचा आहे. इथे कुठेही रबरी टायर नाहीत. आमची बोट फिशिंगची आहे त्यामुळे तिला सुद्धा टायर नाहीत. पाणी लाटांसोबत सतत वरखाली होत. बोट पायऱ्यांना टेकून उभी राहू शकत नाही. ती आपटून फुटू शकते. ती बेटाला समांतर राहते. लाटेबरोबर ती वरखाली होत असते. इंजिन चालूच आहे. बेटावरून कोरलेल्या पायऱ्या उतरून एक माणूस आला. थोडी चौकशी. धक्क्या जवळच्या दगडाला वरती बांधलेल्या रश्या त्याने आमच्या बोटीवर टाकल्या. रश्शी हातात धरायची आणि लाट जेव्हा बोटीला वर आणि बेटाजवळ ढकलेल तेव्हा बोटीवरून दोन ते अडीज फुटाची उडी त्या पायऱ्यांवर मारायची. आम्ही तीन चार जण असे एकेक करून उतरलो. वरच दीपगृह पाहून आलो. तिथल्या कर्मचाऱ्यांशी गप्पा. त्यांनाही माणसाचा संपर्क नसतो. बरं वाटतं पाहुणे आले कि. पावसात त्यांची ड्युटी फुल सिझन असते. होडी बंद. इमर्जन्सी असेल तर हेलिकॉप्टर वापरतात. पिण्यासाठी पाणी रेन वॉटर हार्वेस्ट करून साठवलेल. किमान दोन आठवड्याची शिफ्ट असते बाकीच्या मोसमात. स्वतःच जेवण आणि इतर सर्व काम स्वतःच करायचं. आपल्याला लोकडाऊन चा किती कंटाळा आलाय. इथे त्यांना तो सवयीचा. किंवा मजबुरी म्हणा.
आम्ही बेटावर असताना आमची दुसरी मोठी पर्यटक बोट पार्टीसिपंटस घेऊन आली. असलं दिव्य करून कुणी बेटावर उतणार नाही. ती बेटाला प्रदक्षिणा मारते. आम्ही खाली उतरतो. उतरताना, बोटीवर चढताना सुद्धा तेच. रश्शी हातात ठेवायची आणि बोट जवळ येईल लाटेबरोबर तेव्हा उडी मारून तिच्यावर चढायचं. लिहिताना सुद्धा श्वास रोखून धरलाय मी. परत जाताना आम्ही जुन्या लाईट हाऊस च्या बेटाजवळून गेलो. आता आम्ही चाललोय निवतीला. साधारण १० किमी आहे. वाटेत एक कस्टमची बोट आमच्या दिशेने येतेय. जवळ येऊन थोडी चौकशी. आता किनारा दिसू लागलाय. निवतीचा किल्ला आणि त्या बाजूचा समुद्र. कितीतरी आठवणी असणारा.
निवती बंदरातून माझा मित्र प्रसाद गावडे या बेटांची नियमित सफर घडवतो. अर्थात लाईट हाऊसची नाही. ती आमच्या नशिबाची गोष्ट होती, कदाचित आयुष्यात एकदाच घडणारी.
टिप्पणी पोस्ट करा