ताहुली Tahuli

नोव्हेंबर आणि सुरवातीचा अर्धा डिसेंबर हे माझे लकी महिने. माझ्या मित्रांचे खरंतर मैत्रिणींचे वाढदिवस असतात या महिन्यात. थंडीच्या या दिवसात मी लाल गुलाबगुच्छासारखा टवटवीत, आनंदी आणि उत्साही होतो. भटकंतीला हे दोन्ही महिने उत्तम. नोव्हेंबरची सुरवात दणक्यात झाली ती रतनगड हरिश्चन्द्रगड ट्रेकने. वेंगुर्ला ट्रिप, हर्षुच लग्न, राजगड तोरणा ट्रेक, लोणार ट्रिप, रामबाग माथेरान ट्रेक, पुन्हा वेंगुर्ला असे सलग कार्यक्रम झाले. शेखर, केतकी, राजश्री, सोनाली आणि असे बरेच नवीन भटके मित्र या दरम्यान मिळाले. उत्साहमास संपायला आलाय. आज २९ डिसेंबर, आम्ही ताहुलीला निघालोय. 


सकाळी लवकर कल्याण स्टेशनला जमून चहा नाश्ता झाला. सोबतच्या सवंगड्यांशी ओळखपाळख झाली. यातल्या बऱ्याच जणांसोबत मी आधी भटकंती केलीय. काही नवीन असले तरी सर्व जातीचे भटके असल्याने त्यांच्याशी गट्टी करायला वेळ लागत नाही. बाकी खऱ्या जातीला मी विशेष महत्व देत नाही. माझं लग्न सुद्धा आंतरजातीय झालंय, आज त्याला २० वर्ष झाली. चोविसाव्या वर्षी लग्न झालं म्हणून गमतीने मी त्याला बालविवाह म्हणतो. असो. 

नाश्ता झाल्यावर दोन मारुती इको गाड्यामध्ये भरून आम्ही निघालोय कुशीवलीकडे. ताहुलीला जायला कुशीवली, सावरोली आणि मलंग गडाकडून वाटा आहेत. बदलापूर जवळच्या सावरोलीची वाट चढायला साधारण ४ तास हवेत. कुशीवलीची वाट ३ तासाची. अंबरनाथपासून कर्जतपर्यंत उत्तर दक्षिण धावणारी एक डोंगररांग आपल्याला रेल्वेतून दिसते. रेल्वे आणि उल्हास नदी या डोंगररांगेला समांतर आहे. मलंगगड, ताहुली, गणेश-कार्तिक, चंदेरी-म्हसमाळ, पेब, माथेरान,  प्रबळगड, इर्शाळ, सोंडाई हि या रांगेतली काही मातब्बर मंडळी.  कुशीवली या रांगेच्या पश्चिमेला आहे. कुशीवलीतून पूर्वेला ताहुली, गणेश-कार्तिक तर मलंगगड दक्षिणेला दिसतो. ताहुलीचे उत्तरेला दादीमाँ आणि दक्षिणेला पाचपीर असे दोन भाग करता येतील. दादीमाँची उंची आहे साधारण ७५४ मीटर तर गणेश कार्तिकच्या पाठी असणाऱ्या पाचपीराची उंची साधारण ७८० मीटर आहे.

मारुतीवाल्याने गाडी गावाच्या पुढे बरीच आत शेतात घातली. कच्चा खोल चाकोरीचा रस्ता. इकोच ग्राउंड क्लीअरन्स बरंय तरीसुद्धा इथे गाडी चालवायला कौशल्य आणि जिगर पाहिजे. कुशीवलीच्या धबधब्याला थोडं वाहणारं पाणी होतं तिथे कल्याणहून आणलेली भजी खाऊन आम्ही ट्रेकचा श्रीगणेशा केला. साडेनऊ वाजलेत. चढाईला चांगलं जंगल आहे.  मजल दरमजल करत, दम खात, बसत थांबत आम्ही ११ वाजता गणेश कार्तिकच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवमंदिरापाशी आलो. इथे एका बाबाची झोपडी आहे. इथे पाण्याची सोय आहे. काही मंडळींनी इथे रात्रीचा मुक्काम केला होता. मनोज पायलट साठी इथवर येऊन गेला होता. या ठिकाणाची उंची आहे १९० मीटर. इथे थोडा विश्राम आणि फोटोग्राफी. 

पुढे बऱ्यापैकी सपाटीवर जंगलातून वाट आहे. अर्धा तास चालल्यावर दगडाच्या पायऱ्या लागतात. त्या संपल्यावर वाट जंगलातून बाहेर येते आणि चढू लागते ती तावलीच्या धारेवर. धारेवर छोटीशी खिंड आहे. डाव्या बाजूला दादीमाँ, उजव्या बाजूला पाचपीर, समोरच्या बाजूला बदलापूर. उंची आहे ३५० मीटर. बाबाच्या झोपडीपासून १५० मीटर आपण चढून आलो. आम्ही इथे सगळे सवंगडी येईपर्यंत बराच वेळ बसून होतो. थोडी खादाडी , थोडे फोटो.  इथं पोहोचलो तो सव्वा बारा वाजलेत. साडेबाराला आम्ही खिंडीतून दादीमाँकडे चढायला सुरवात केलीय. पाऊण तासात वरती. दीड वाजता सावलीत अंगतपंगत. इथल्या दर्ग्यात पाणी मिळेल. हर्षदा, सोनम वि मिस्ड यु. मी आणि उल्काने एक विडिओ रेकॉर्ड केला आणि दोघीना पाठवून दिला. जेवल्यावर थोडी वामकुक्षी. अडीज वाजता आम्ही खिंडीकडे उतरायला सुरवात केलीय.
दादीमाँ परिसरात बऱ्याच स्त्रिया उपचारासाठी येतात. दवा काम करत नाही तिथे दुवाने काम होतं का पाहायला किंवा परिस्तिथीने गरीब, अडाणी असल्याने. बहुदा सगळे मराठी मुसलमान. एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे या स्त्रियांना साखळदंड अंगावर घातलेत. पायात बेड्या, गळ्यात बेड्या, अगदी कुलूप सुद्धा लावलेलं. हि कुठल्या प्रकारची अघोरी पद्धत.  वरती एक बाई झोपली होती. साखळदंड अंगावर, तिला सलाईन चालू आहे. बहुदा ग्लुकोज. एक माणूस तिच्याजवळ बसला होता. आम्ही शिवमंदिर चढत असताना रस्त्यात थांबलो होतो तेव्हा दोन बायका खाली उतरत होत्या. त्यातील एकीच्या पायात बेड्या होत्या. मला आधी वाटलं दागिने आहेत कि काय. आता माझ्या लक्षात येतंय.  

पुन्हा खिंडीपाशी यायला तीन वाजले. मी खिंडीतून थोडं खाली उतरायच्या वाटेवर थांबलो. लीडरच्या मनात काही वेगळंच आहे तो आम्हाला पाचपीरकडे घेऊन चाललाय. म्हणजे ६च्या आधी आम्ही आज खाली उतरत नाही. खिंडीतून दादीमाँ पाठी ठेऊन आम्ही पाचपीरकडे चाललोय. थोड्यावेळाने वाट जंगलात घुसते. पावणे चार वाजता आम्ही पाचपीरला येतो. इथे फोटो, चहा पिऊन चारच्या सुमारास आम्ही परतीची वाट धरलीय. पाचपीरकडून पुढे एकपिरापर्यंत आणि पुढे जाता येतं. पुन्हा कधीतरी. खिंड, शिवमंदिर करून काळोख होताना अर्धा ग्रुप खाली धबधब्यापाशी येतो. अर्धा तास वाट पाहिल्यावर मी आणि डॉक्टर अमित टॉर्च घेऊन पाठच्या ग्रुपकडे निघालोय. सगळे आल्यावर आम्ही टॉर्च लावून एकत्र धबधब्याकडून निघालोय. पुढे पुढे उल्का मनोजच्या मैत्रिणींना हात धरून चालवत होती. गावात पोहोचायला सव्वा आठ, साडे आठ होतात. आमच्या सकाळच्या गाड्या आलेल्या आहेत. इथून कल्याण आणि ट्रेनने घरी. मजा आली ट्रेकला. ताहुली एकदिवसात करायला वेळेचं फार काटेकोर नियोजन पाहिजे. पावसात दिवस मोठा असताना उत्तम. 

दुसऱ्या दिवशी मला कळलं माझे हिमालयातील ट्रेकचे मित्र याच दिवशी माथेरानला ट्रेकला गेले होते. आमचा चौघांचा हिमालयीन ट्रेकचा ग्रुप होता. मी ताहुलीला जाणार आहे हे मी त्यांना सांगितलं होतच. पण या तिघांचं माथेरान कधी ठरलं ते त्यांनी मला कळवलं नाही. कारण काहीही असो. हो, मी आहे थोडासा पझेसिव्ह. शेवटी आमचा वाद झाला. इतका कि माझी हिमालयातल्या प्रवासाची स्वतंत्र व्यवथा केली. तरी माझी मनापासून इच्छा होतीच, त्यांनी माझं म्हणणं धुडकावून लावावं आणि त्यांच्यासोबत जातायेता माझंहि बुकिंग करावं. सध्या कोविड१९ मुळे आमचा हिमालयातील ट्रेक रद्द झालाय. पेल्यातलं वादळ शांत झालंय. गाठ नाहीये मनात माझ्या. गुलाब एव्हाना सुकलाय, त्याचा रंग आणि सुवास अधिक गडद झालाय. हुंगून पहा हवंतर... 

-मधुकर धुरी 
   
ट्रेकिंग हा साहसी खेळ आहे. इथे व्यसनांना अजिबात स्थान नाही. व्यसन आणि ट्रेक याची सांगड म्हणजे अपघातास नक्की निमंत्रण. तेव्हा व्यसने टाळा. ट्रेक करताना निसर्गस्थानिक यांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. "Leave nothing but footprints. Take nothing but photos. Kill nothing but time. Keep nothing but memories".

Original Article  Oikos Natura