मीच उगाच जवळ आले होते I was just getting closer


तू कुणी नव्हतासच माझा 
मीच उगा जवळ आले होते 

भेगाळल्या भुईला वाटलं, मृगाचा पाऊस 
पण तू होतास मृगजळ 

केला प्रयत्न मी, तुला विसरायचा 
नंबरही काढून टाकला होता, मोबाईल मधून एक दिवसाचा 

हसले तर तुला सांगतेच 
दुखले, तर मात्र तुला सांगायची सोय नाही 

एवढ्यात विसरलास 
सोबत चाललेले उन्हाळे, पावसाळे 
चोखलेले आंबे आणि मावळतीचे बगळे 

ठीक आहे तू स्थितप्रज्ञ 
आणि मी वेडी राधा 
पण कधीतरी तुझं मन सुद्धा कातर होत असेल ना 

मला विसर म्हणताना 
रोज मथुरेच्या वाटेकडे, डोळे लावून पाहताना 
माझ्या काळजाचं होणारं पाणी 
आर्त साद घातलेली गाणी 
तुझ्यापर्यंत पोहोचतच नसतील 

का, तू कुणी नव्हतासच माझा ?
मीच उगा जवळ आले होते 

- मधुकर धुरी