कोर्ट चालु आहे Court is in Session



वयाच्या १४व्या वर्षी आपल्या मामाच्या प्रेमात पडली. प्रेमभंग, अपेक्षाभंग झाल्यावर आत्महत्या करायचा प्रयत्न. या पुढे प्रेमात पडायचं नाही मनाला निष्टुन बजावलेलं. तरीसुद्धा वयाच्या तिशीनंतर पुन्हा प्रेमात पडली, ती सुद्धा एका लग्न झालेल्या पुरुषाच्या. त्याला तिच्या प्रेमात रस नव्हताच, त्याला हवं होतं तिचं शरीर. ती गर्भार आहे आणि तो तिच्याशी लग्न करणार नाहीये. तिच्या अवतीभवतीचा समाज तिला दोषी ठरवत तिच्या गर्भाची हत्या करण्याची शिक्षा तिला ठोठावतो. ती ठाम आहे ती तिचं मूल वाढवणार आहे. मिस बेणारे. समाजाच्या झुंडशाहीची बळी. नाटक - शांतता, कोर्ट चालू आहे. 

नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर म्हणतात 'माणूस हा शेवटी प्राणिसृष्टीचाच भाग आहे. माणसाला मोठा मेंदू मिळाला म्हणून माणसाने असा समज करून घेतला कि आपण वेगळे आहोत. जेव्हा कसोटीचे क्षण येतात तेव्हा माणसांचे प्राणी होतात. भयावह, प्रतिकूल, विपरीत परिस्तिथीत माणूस प्राण्याप्रमाणे रिऍक्ट होतो.' 

हिंसा हा मनुष्यप्राण्याच्या अंगभूत गुण आहे. दुसरं आहे राजकारण. प्रत्येक दोन माणसांच्या संबंधात राजकारण असतं. चढाओढीचं आणि कित्तेक इतर पदर त्याला असतात. स्त्रियांवर होणारे अत्याचार, अन्याय, लैगिकता तेंडुलकरांच्या नाटकात ठसठशीत दिसते. 

मला वाटतं माणूस स्वार्थी आहे. श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक, हिंसा-अहिंसा, चूक-बरोबर हे सर्व व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष आणि कालसापेक्ष आहे. ६० आणि ७० च्या दशकामध्ये तेंडुलकरांनी काळाच्या पुढली किंवा कालातीत नाटकं लिहून मराठी नाटकाला नवीन स्वतंत्र आयाम दिला. विजया मेहता म्हणतात त्याप्रमाणे कुठचीही कला रिफ्लेक्ट करते, घडवत नाही. तात्कालिक समाजाचं चित्रण कलेमध्ये आपसूक उतरतं. 

गिधाडे, सखाराम बायंडर, शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल अशी एकाहून एक सरस पांढरपेशा समाजाचा बुरखा फाडणारी नाटकं तेंडुलकरांनी लिहिली. निळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, मोहन गोखले, लालन सारंग, सुलभा देशपांडे अशा दिग्गजांनी ती रंगभूमीवर साकारली.   

अलीकडे एक सिनेमा आला होता थप्पड. नवऱ्याने चारचौघात कानाखाली मारल्याने घटस्फोट अशी त्याची कथा. तेंडुलकर म्हणतात प्रत्येक पुरुषाला बाईच्या अंगावर हात उचलायची उर्मी असते. 

मला वाटत स्त्रिया कमावत्या झाल्या, आत्मनिर्भर झाल्या तेव्हापासून एक गोष्ट नक्की. यापुढे त्या पुरुषांवर कमी अवलंबून आहेत. आजूबाजूला लग्न कमी होताना दिसतात. घटस्फोट वाढलेत. शरीरसुखासाठी लग्नाच्या बंधनाची, अधिक काळाच्या नातेसंबंधांची गरज उरलेली दिसत नाही. शाळा कॉलेजच्या वयापासून मुलं प्रेमात असतात. लग्न होऊन सुद्धा मूल जन्माला घालताना जोडपी दिसत नाहीत त्यामुळे मूल होण्यासाठी म्हणून लग्न असेही नाही. शिवाय एकटे पालक दत्तक किंवा सरोगसीने मुलं वाढवताना दिसताहेत. थोडक्यात अपत्यासाठी लग्न हा विचार मागे पडलाय. लिव्ह इन मध्ये राहणारी जोडपी दिसतात. मला वाटतं लिव्ह इन मधील जोडप्यांच्या मुलांना सुद्धा समाज मान्यता देईल. किंबहुना लिव्ह इन मधील एकल पालक सुद्धा मुलं वाढवतील. काहीकरून लग्न करायचंय अशी अपरिहार्यता आता स्त्रिया आणि पुरुषांची राहिलेली नाही. 

शिक्षणाने लग्नाचं वय वाढलं. मग करियर मुळे ते अधिक लांबत. जोडीदाराच्या विचारानं चालायला लागेल, मनाजोगता जोडीदार मिळाला नाही म्हणून सुद्धा कमावत्या शिक्षित व्यक्ती अविवाहित राहिल्यात. एकट्या राहणाऱ्या, जोडीदार नसणाऱ्या किंवा जोडीदार समागमासाठी सक्षम नाही अशा स्त्री पुरुषांना लैगिक इच्छा नसतात का? मला वाटतं असे लोक मन मारतात, लैंगिक इच्छा दडपण्याचे मानसिक परिणाम या व्यक्तींवर होत असतील काय? कदाचित अशा व्यक्ती हस्तमैथुन, जे सर्वात सुरक्षित आहे किंवा पेडसेक्सच्या पाठी जातात. पेड फनचे अनेक पर्याय सध्याच्या इंटरनेट जगात उपलब्ध आहेत. टिंडर किंवा तत्सम डेटिंग ऍप्लिकेशन्स हुकपसाठीच बनवली आहेत कि काय अशी शंका यावी.
अलीकडे बातम्या वाचतो आपण, भविष्यात साठीच्या पुढील लोक सुद्धा लिव्ह इन किंवा लग्न करून सोबत राहताना दिसतील. शरीर थकल्यावर हक्काच्या प्रेमळ माणसाचीच गरज लागते. अजून एक महत्वाची गोष्ट मला वाटते. जशी परदेशात असतात तशी वृद्ध लोकांसाठी डे केअर सेंटर, समाजमंदिर आपल्याकडे दिसत नाहीत. आपल्याकडे आहेत ते वृद्धाश्रम ज्यात मुख्यत्वे निराधार लोकच जास्त आहेत. कुटुंब व्यवस्था अजून आपल्याकडे टिकून आहे. कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाल्यावर वृद्धाश्रमाच्या पलीकडे एकट्या दुकट्या वृद्ध लोकांच्या डे केअर संस्थांची गरज आपल्याकडे लागेल. परदेशात लोक ७० वर्षापर्यंत सहज नोकरी धंदा करून पैसे कमावतात. आपल्याकडे निवृत्तीचं वय आणि मृत्यूचं सरासरी वय कमी आहे. भारत विकसित होईल. लोकसंख्या आटोक्यात येईल तेव्हा निवृत्तीचं वय वाढेल. 

थोडं विषयांतर झालं पुन्हा तेंडुलकरांकडे आणि शांतता कडे येतो. नाटकचा फॉर्म नाटकातलं नाटक आहे. अभिरूप न्यायालय. म्हटलं तर खरं म्हटलं तर नाटक. लेखकातला पत्रकार तटस्थपणे लिहितो. नाटक संपत येताना नायिकेच ह्रिदयस्पर्शी स्वगतः आहे.

होय, मला पुष्कळ काही म्हणायचंय.
किती वर्षात काही म्हटलंच नाही.
क्षण आले क्षण गेले. गळ्यात अनेक वादळं दाटली.
छातीत  प्राणांतिक आक्रोश झाले. पण दर वेळी ओठ धरले घट्ट दाबून.
वाटल हे कुणालाच नाही कळणार. कुणी नाही समजू शकणार.
जेव्हा मोठ्या मोठ्या शब्दांच्या लाटा येउन देत ओठांवर धडका,
तेव्हा भोवतालची सारी माणसं कशी वेडीखुळी, बालबुद्धी, बुद्दू वाटत. अगदी माझा म्हटलेला माणूस धरून सारी माणसं.
वाटायचं सर्वाना फक्त पोटभरून हसून घ्यावं, बस्स, हसून घ्यावं.
आणि रडून रडून आतडी पिळवटायची. छाती फुटेल तर बर असं वाटायचं.

जीव नकोस व्हायव्हा.
तो गेला नाही तेव्हाच त्याच महत्व कळत
जगण्याचं महत्व कळत
सुख कळत
येणारा  प्रत्येक क्षण कसा नवा अपूर्वाईचा  असतो
आपणच आपल्याला नवे होतो
आकाश पक्षी ढग,

एखाद्या वटलेल्या झाडाचा  हळूच डोकावणारा एकच भाग
नि खिडकीचा हलता  पडदा
नि भोवतालची शांतता
नि लांबचे  बारीक सारीक एकेक आवाज
नि इस्पितळातल्या औषधाचा दर्प
तो देखील जीवनाने नुसता रसरसलेला वाटतो
जीवन जणू चोफेर धरून एकट्या आपल्यासाठी गातंय असं वाटतं

हुकलेल्या आत्महतत्येतला  आनंद फार मोठा असतो
जगण्याच्या वेदनेतून मोठा
प्राण उधळावा तेव्हाच तो जपण्याच्या लायकीचा असण्याचं पटतं
प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हाच तो उधळण्याचा लायकीचा असल्याचं पटत
मज्जा आहे नाही?
जपावा तर उधळण पटत उधळावा तर  शिल्लक राहण्याचं सुख मिळत
काही पुरत नाही पुन्हा तेच तसच

जीवन हे असं आहे.
जीवन हे अमुक आहे
जीवन म्हणजे तमुक आहे
जीवन म्हणजे टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे
जीवन म्हणजे स्वतःला डंख करणारा महाविषारी सर्प आहे
जीवन म्हणजे विश्वासघात आहे , जीवन म्हणजे प्रतारणा आहे
जीवन म्हणजे नशा आहे
जीवन म्हणजे रखडपड्डी आहे
जीवन म्हणजे काहीतरीच आहे असं काहीतरी आहे
किंवा काहीतरीच आहे असं काहीच नाही

मिलॉर्ड
जीवनाला फाशी दिली पाहिजे जीवन हे महाभयंकर गोष्ट आहे
न जीवनम जीवन अर्हती
जीवनाला चौकशी करून नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे
का पण का? का? मी माझ्या कामात कुचराई केली?
मी छान रमत आले आमच्या पोरांमध्ये
त्यांना शिकवत आले
मला कळत होत कि आयुष्य सिध साधं नाही
मनुष्य फार क्रूर होऊ शकत
अगदी आपल्या रक्ताची नाती सुद्धा आपल्याला समजून घेऊ इच्छित नाहीत
जीवनांत फक्त एकच गोष्ट सर्वमान्य आहे, शरीर,
नाही म्हटलं तरी तेच  सर्वमान्य आहे
भावना हि फक्त हळवं होऊन बोलण्याची गोष्ट
सार काही दिसत होत मला
जगत होते मी तेच
पोळून निघत होते
पण आहे कुणाला माहित?
मी हे नाही ते कोवळ्या कोवळ्या जीवांना शिकवलं
मी ते विष पचवलं
पण त्याचा ओझरता भास हि त्यांना नाही लागू दिला
मी त्यांना सौन्दर्य शिकवलं पावित्र्य शिकवलं
आतून रडत मी त्यांना हसवलं
आतून निराशेनं पिचत मी त्यांना आशावादीच करत आले
मग कोणत्या गुन्ह्यासाठी माझी नोकरी
माझं एकुलता एक विरंगुळा घेताहेत माझ्याकडून

माझं खासगी आयुष्य हा माझा प्रश्न आहे
मी माझं काय करायचं ते मीच ठरवीण
जस ते प्रत्येकाला स्वतःपुरतं ठरवता आला पाहिजे
ज्याचा त्याचा एक पिंड असतोय एक मार्ग असतो नि शेवट असतो
त्याचा सर्वांशी काय संबंध?

सायलेन्स, आवाज बंद,  किती गोंगाट देवासारखे बस सर्व गप्प
बिच्चारे !
मुलांनो हे सर्व कोण?
हे विसाव्या शतकातले सुसंस्कृत माणसांचे अवशेष
पहा कसे एकेकाचे चेहरे रानटी दिसतात ते
त्यांच्या ओठावर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत
पोटात अतृप्त वासना आहेत

नकारे, नकारे मला अशी एकटी सोडून जाऊ
नकारे मला इथे अशी टाकून जाऊ
मला यांची फार भीती वाटते
मला कबुल आहे कि मी पाप केलं
मी आईच्या भावावर प्रेम केलं
पण आमच्या घरच्या शिस्तीत माझ्या उमलत्या शरीराच्या बहरात तोच माझ्या जवळ आला
माझ्या बहराला रोज वाखाणू लागला
माझे लाड करू लागला
मला काय माहित
कि ज्याच्याबरोबर काळीज फोडून मला एकरूप व्हावस वाटत
ज्याच्या नुसत्या संगतीत माझ्या जिन्याचा सार्थक आहे मला वाटतं
तो मामा असला तर ते पाप आहे म्हणून ?

अवघ्या चौदा वर्षाची होतेरे मी तेव्हा
पाप काय असतं? तेसुद्धा ठाऊक नव्हतं तेव्हा मला. आईशप्पथ.
मी लग्नाचा हट्ट केला कारण मला सगळ्यांसारखं राजरोस माझं सुंदर आयुष्य जगता यावं म्हणून
पण आईसकट सगळयांनी त्याचा विरोधच केला
माझा पुरुष शेपूट घालून पळाला
इतका संताप आला होता त्याचा
वाटलं त्याच तोंड फोडाव भर चौकात
थुंकावं त्याच्या तोंडावर

पण मी तेव्हा दुबळी होते , अज्ञानी होते
मीच मरण्याच्या मिठीत जाण्यासाठी उडी घेतली घराच्या सज्ज्यातून, पण नाही गेले
शरीराने नाही मेले, वाटलं मनाने पुरती मेले
पण तशीही नाही गेले
मी पुन्हा एकदा प्रेम केलं
प्रौढपणी प्रेम केलं.
जीव तोडून प्रेम केलं
मानलं कि हे वेगळं आहे
हे सुजाण आहे
हे एका अलौकिक बुद्धिमत्तेवरच प्रेम
पण इथेही तीच चूक
माझ्या मनाच्या भक्तीसाठी देहाचा नेवेद्य झाला
आणि माझा बुद्धिमान देव तेवढंच घेऊन चालता झाला
त्याला माझं मन माझी भक्ती नकोच होती मुळी
नकोच होती.

तो देव नव्हताच, तो माणूसच होता,
ज्याचं सारंकाही होतं शरीरापुरतं, शरीरासाठी, बास!
पुन्हा तेच.

हे शरीर सगळा घात करतंय
मला अगदी किळस वाटते या शरीराची
आणि फारफार प्रेमही वाटतं
त्याचा रागही येतो आणि वाटतं अखेर ते आहे मग?
ते तुझच आहे, तुझच असणार आहे
तुझ्याशिवाय ते कुठं जाईल? आणि तू तरी त्याच्याशिवाय कुठे जाशील
कृतघ्न होऊ नकोस
त्याने जळत तुला अत्यंत सुंदर स्वर्गीय उत्तुंग असा क्षण दिला बस
विसरलीस ?
त्याने शरीरापलीकडे जाऊन उंचउंच एका दिव्यलोकात तुला त्याक्षणी नेलं होतं , नाकारशील?
आता त्याच क्षणाची साक्ष आहे तुझ्या देहात, एक कोवळा कोवळा अंकुर
उद्याच्या हसत्या नाचत्या बागडत्या जीवाचा माझ्या मुलाचा माझ्या प्राणाचा
त्याच्यासाठी हा देह आता मला हवाय
त्याच्यासाठीच

त्याला आई हवी, हक्काचे वडील हवेत, घर हवं, सुरक्षा हवी, प्रतिष्ठा हवी......

नाटकात कोर्टावर सुद्धा मिश्किल भाष्य केलंय. कोर्ट नावाचा अतिशय सुंदर मराठी सिनेमा आला होता. नाटकातलं भाष्य थोडंसं तसं वाटलं मला. निपुण धर्माधिकारीची अलीकडे मुलाखत पाहत होतो. तिथे सत्यदेव दुबेंच्या वर्कशॉप चा उल्लेख आला. आणि गुगलने दुबेजींनी दिग्दर्शित केलेला सिनेमा मी पाहावं असं सुचवलं. शांतता, कोर्ट चालू आहे. आधी मी तो सिनेमा पहिला, मग पुन्हा नाटक पाहिलं. इतक्या वर्षात हि कलाकृती माझ्या पाहण्यात आली कशी नाही? असो. तेंडुलकर नावाच्या माणसाला समजून घेणं कठीण आहे. खरंतर कुठल्याच खऱ्या माणसाला समजून घेणं कठीण आहे. हिंसेकड्न प्रेमाकडे जाण्यात मनुष्यजातीचं भलं आहे.

- मधुकर धुरी