तु माझ्याकडून काहीही माग पण माझ्या प्रेमावरचा विश्वास एवढा कधीच मागू नकोस


ही प्रेमकथा प्रेमवीरांसाठी आहे. ज्यांना प्रेमामध्ये फक्त निराशाचं हाती लागली आहे. म्हणुन ते मरणाचा विचार करत आहे. अशांनी ही प्रेमकथा एकदा वाचा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या.

आज मी टकमक टोकावर आलोय जिथून अनेक प्रेमवीरांनी जीव दिला आहे. प्रेमामध्ये मिळत असलेल्या निराशेने मी तर वैतागलोय. मी अशा ठिकाणी उभा आहे जिथुन त्या खोल दरीच्या तळाशी माझी नजरही पोहोचत नाही आहे. थरथरत्या अंगाने मी माझे डोळे झाकले. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर माझा खेळ खल्लास. पण तेवढ्यात एक हाक माझ्या कानी ऐकु आली. मी मागे वळुन पाहीलं तर एक वेडीशी दिसणारी म्हातारी मला हाक मारत होती. मी तिथे गेलो, तिने बसायला सांगितलं मी बसलो.
ती आजी : जीव देतोयस का?
मी : हो.
आजी : का?
मी : मी जिच्यावर प्रेम केलं, तिला आज मी प्रपोज करायचं ठरवलं, म्हणून मी एक गुलाबाचं फुल घेऊन तिच्या घरी गेलो. तेव्हा तिच्या वडीलांनी तिच्या लग्नाची पत्रिका माझ्या हातात ठेवली. ती पत्रिका पाहताच माझ्या डोळ्यातला एक अश्रु अनाहुतपणे त्या पत्रिकेतील तिच्या नावावर पडला आणि मी तिथून तडख इकडे निघालो जीव देण्यासाठी..

आजी : आता मी जे काही तुला सांगते ते ऐक आणि मगचं तुला हवा तो निर्णय घे. ते झाड दिसतंय? हो दिसतंय.... ते दोघे दर संध्याकाळी पाच वाजता इथेच भेटायचे... तो 22 चा आणि ती 19 ची. एकमेकांवर खुप प्रेम करायचे ते.. रुसायचे.. बागडायचे... कॉलेजमधल्या चांगल्या वाईट गोष्टी एकमेकांसोबत कायम शेअर करायचे.... तो कायम तिच्यासाठी एक गुलाबाचं फुल आणायचा, आणि ते जर तिला हवं असेल तर तिच्याकडुन गालावर चुंबन घ्यायचा.... तिला ही ते आवडायचं.., तो तिला कायम म्हणायचा "तु माझ्याकडुन काहीही माग पण प्रेमावरचा माझा विश्वास एवढा कधीच मागु नकोस" पण त्याच्या या matuare वाक्याचा अर्थ तिला कधी कळलाच नाही... ती तर फक्त त्याच्या सहवासाची मजा लुटत होती.... पण एक दिवस तो गुलाबाचं फुल आणायला विसरला, आणि मग तो तिचा रुसवा काढु लागला, पण ती काही ऐकत नव्हती. तु सांग तुझ्यासाठी काय करु? तो त्या टेकडीच्या कडेला जाऊन उभा राहिला आणि दोन्ही हात मोकळे सोडुन (टायटॅनिकपोझ मध्ये) म्हणाला, बघं तर आज वारा कसला छान सुटलाय आणि त्याची मजा घ्यायची सोडुन तु रुसलीयस कसली. ती रागाने त्याला म्हणाली, तुला जे हवं ते कर मी नाही येणार. तो म्हणाला ही दरी बघतीयेस तु रुसवा नाही सोडलास तर मी इथुन उडी मारुन जीव देईन... हो तर आला मोठा जीव देणारा... मी खरंच जीव देईन..... मी शेवटचं सांगतोय मी खरंच जीव देईन..... (ती गप्पच राहीली) जेव्हा त्याची हाक पुन्हा तिला ऐकु आली नाही. तेव्हा तिने मागे वळुन पाहीलं.. तर तो तिथे नव्हता...ती खुपच घाबरली आणि त्या टेकडीच्या कडेला जाऊन पाहीलं, तर त्याचा रक्तानं बरबटलेला शर्ट एका काटेरी झाडाला लटकत होता, ते बघुन ती हबकलेल्या चेहऱ्याने तीन चार पाऊले मागे सरकली, तिच्या छातीत वीज चमकली होती, तिची श्वासगती वाढली होती, तिचे हात पाय गार पडले होते, तिच्यासाठी तर हे आभाळचं थांबलं होतं. ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पीटलमध्ये होती. स्थानिकांनी तिला तिथं पोहोचवलं होतं. तिला हे सत्य कळालं की, त्याचं मृत प्रेत याच हॉस्पीटलमध्ये आहे, तिला तिथं नेण्यात आलं. ती त्याच्या त्या प्रेताकडे बघून रडु लागली. रडता रडता तिला त्याचं ते वाक्य आठवलं. "तु माझ्याकडुन काहीही माग पण माझ्या प्रेमावरचा विश्वास एवढा कधीच मागु नकोस" तिला आता या वाक्याचा अर्थ समजला होता. पण, तो समजेपर्यंत खुपच उशीर झाला होता. आजींनी सांगितलेली ही कहाणी ऐकुन मी तर खुपचं हबकलो होतो. आजी मला म्हणाली, मुला त्या मुलीने जी चुक केली ती तु करु नको, जा आणि तुझं प्रेम मिळवं. आत्महत्या करण्याचा विचार तर कधीच माझ्या मनातुन उडून गेला होता, याला कारणीभुत होती ही आजी. मी तिथुन एका नव्या उमेदीने आणि आशेने निघालो.
दोन आठवड्यानंतर.... .

आजच आम्ही पळुन जाऊन लग्न केलं, कौतुक तर हीचं करावं लागेल जिच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या असताना ही तिने माझं प्रपोजल स्वीकारलं आणि माझ्यासोबत पळुन जाऊन लग्न करण्यास तयार झाली. माझ्यावर आधीपासुनच तिचं प्रेम होतं हे ती आता सांगतीये मला.. या मुलीदेखील ना... असो आज मी त्याच आजीचा आशिर्वाद घ्यायला जातोय जिने मला दुसरा जन्म दिला आणि जिच्यामुळे मला माझी जीवनसाथी मिळाली, आशा आहे की ती मला तिथेच भेटेल जिथे आधी आम्ही भेटलो होतो.. आजीची आणि आमची भेट झाली, तिला जास्त काही शोधावं लागलं नाही. पण वयोमानानुसार पाहिलं तर तिनं मला ओळखलंच नाही, नंतर सर्व हकीकत सांगितल्यावर मग तिने ओळखलं. आम्ही तिचा आशिर्वाद घेतला पण आजीने सांगितलेल्या त्या कहाणी विषयी काही प्रश्न माझ्या मनात होते ते मी तिला विचारलं. आजी त्या मुलगीचं पुढे काय झालं? काय तिने दुसरं लग्न केलं? ती कोठे असते आता? आजी थोडी शांत झाली आणि म्हणाली, मुला ती पोरगी मीच..