कोल्हापुरात कोरोना वाढलं


कोल्हापूरात कोरोनाचा कहर

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला  आहे. जिल्ह्यात काल (18 मे) एकाच दिवसात तब्बल 52 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 101 वर पोहोचली आहे. एकाच दिवसात 52 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरच्या सर्वच तालुक्यात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. काल रात्री 28 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 52 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात काल एका 35 वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने जिल्ह्याच्या यंत्रणेची झोप उडाली आहे.

सध्या मुंबई आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या शहरातील अनेक जण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जात आहेत. त्यामुळे तेथेही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, असं म्हटलं जात आहे.

नुकतेच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही महाराष्ट्रातील नागिरकांना मुंबई, पुण्यातून गावी न जाण्याचे आवाहन केले.

मुंबई-पुण्यातून आलेल्यांमुळे डोकेदुखी

दरम्यान मुंबई-पुण्यातून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्यांमुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कारण हे नागरिक गावी गेल्यानंतर तिथे त्यांची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिकांनाही त्याचा त्रास होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीडसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर