उष्माघाताने मृत्यू; कामगारा पुण्याहून पायी निघाला


मानवत बतम्या : पुण्याहून पायी गावाकडे मानवतला (जि. परभणी) जात असताना एका ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पिंटू पवार असे त्यांचे नाव आहे. धानोरा (ता. आष्टी) येथे त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. करोना विषाणूचे संकट श्रमिकांच्या जीवावर उठल्याचे या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
🧐 बीडला दिलासा, कोरोनाचे मिटर थांबले
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडणीनंतर पवार पुण्यातील भावाकडे गेले होते. दरम्यान, लॉकडाउन जाहीर झाले. काहीकाळ पुण्यात थांबल्यानंतर ते पायीच गावी निघाले होते. आष्टी तालुक्यातील धानोरा येथे पत्र्याच्या शेडमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी आष्टी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. खिशातील चिठ्ठीवर असलेल्या फोन नंबरवर संपर्क करून ओळख पटवण्यात आली. ग्रामस्थांच्या माहितीनुसार ते चार ते पाच दिवसांपासून शेडजवळ होते. मृतदेह चार दिवसांपूर्वीचा असल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ग्रामपंचायतीच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. करोनामुळे त्यांच्या पत्नीसह अन्य नातेवाईकांना त्यासाठी उपस्थित राहता आले नाही.
💥 धक्कादायक; बीडमध्ये कोरोनासाठी स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा आयसोलेशन वार्डमध्ये मृत्यू
पायी जाण्याची दुसरी घटना

पुण्यातून हिंगोलीला पायी जाणाऱ्या एकास करोना संसर्ग झाल्याची घटना एप्रिलमध्ये उघड झाली होती. त्याची तपासणी केली असता तो परभणीत जिल्ह्यातील पहिला करोना रुग्ण ठरला होता. तोही बीड जिल्ह्यातून चालत गेला होता. जिल्ह्यातील एका तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या १२ कर्मचाऱ्याशी तो संपर्कात आला असल्याची शक्यता होती. त्यामुळे या बारा पोलिस व इतरांचे नमुने घेण्यात येऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, ते निगेटिव्ह आले होते.