शिंदे अन् बंडखोर आमदारांनी रेडिसन ब्लू हॉटेलचे बिल भरले, वाचा किती आला खर्च



गुवाहाटी : विधानपरिषदेच्या निकालानंतर व्हाया सुरत गुवाहाटी येथे मुक्कामी गेलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी रेडिसन ब्लू (Radisson Blu) या हॉटलचे संपूर्ण बिल दिल्याचं सांगितले जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्काम होते. बुधवारी चेक आऊट करताच या सर्वांनी हॉटेलचे बिलं (Radisson Blu Hotel Bill) दिल्याचं एका हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आठ दिवसांचे बिल नेमकं किती आले याचा आकडा या कर्मचाऱ्याने सांगण्यास नकार दिला. असे असले तरी, ही रक्कम 68 ते 70 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (Eknath Shinde Radisson blu)

सर्व 70 रूम करण्यात आल्या होत्या बुक

बंडखोरी केल्यानंतर या सर्व आमदारांच्या वास्तव्यासाठी गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलची निवड करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, हॉटेल बुकिंगवेळी येथे असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजेच 70 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. तसेच हॉटेलचे रेस्टॉरंट, बॅक्वेटसह इतर सुविधा बाहेरील लोकांसाठी 22 ते 29 जून या कालावधीत संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील सर्व आमदार सामान्य पाहुण्याप्रमाणे याठिकाणी थांबले होते असेही हॉटेलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच या सर्वांनी हॉटेल सोडण्यापूर्वीच संपूर्ण बिल भरल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले


जेवणाचे बिल अंदाजे 22 लाख

या हॉटेलमध्ये आमदार ज्या रूम्समध्ये थांबले होते त्या सुपीरियर आणि डिलक्स श्रेणीतील होत्या. रेडिसन ब्लूच्या वेबसाइटनुसार, गुवाहाटी येथील या हॉटेलच्या खोल्यांचे भाडे डायनामिक असून यामध्ये जवळजवळ दररोज बदल केला जातो. सामान्यत: सुपीरियर रूमचे भाडे सुमारे 7500 च्या आसपास तर, डिलक्स रुमचे भाडं दररोज 8500 रुपये असते असे सूत्रांनी सांगितले. या हॉटेलमध्ये काही डिलक्स आणि सुमारे 55 सुपर डिलक्स रूम आहेत. या सर्व रुमचे आमदारांच्या आठ दिवासांचे भाडे डिस्काउंट आणि टॅक्स मिळून अंदाजे 68 लाख तर जेवणाचे बिल सुमारे 22 लाख रुपये आल्याचे समजते.


credit sakal