जी ताकद हनुमान चालिसामध्ये तीच ताकद नमाजमध्ये, जातीधर्मातून बाहेर पडा : सोनू

 


जातीधर्मामधून बाहेर पडा, तरच देशाचा विकास शक्य


अभिनेता सोनू सूदने काल शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या चरणी माथा टेकवल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी सध्याच्या भोंगा वादावर त्याला विविध प्रश्न विचारले. त्यावर त्याने जातीधर्मामधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. तसंच देशात शिक्षण, रोजगार यांसारखे महत्त्वाचे विषय आहेत, यावर काम होणं गरजेचे असल्याचं म्हणत एकप्रकारे हनुमान चालिसा-नमाजवरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकारे लगावले.


जी ताकद हनुमान चालिसामध्ये आहे, तीच ताकद नमाज किंवा अजानमध्ये


सोनू सूद म्हणाला, "जी ताकद हनुमान चालिसामध्ये आहे. तीच ताकद नमाज किंवा अजानमध्ये असते. दोन्हीही ऐकण्यासाठी कानांना तितक्याच चांगल्या वाटतात. त्याचे पावित्र्यही तेवढंच आहे. धर्म हा लोकांनी बनवला आहे. यातून बाहेर पडणे गरजेचं आहे. देशाचा विकास तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा आपण धर्म, जाती या सर्वातून बाहेर पडू. देशाला एकत्र होणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर आपण याच गोष्टीत अडकून राहिलो तर लोकांच्या समस्या कधीच संपणार नाही"


राज ठाकरे यांची भूमिका


"भोंग्याविरोधातील आंदोलन हा विषय एक दिवसाचा नाही. मनसे कार्यकर्ते आणि हिंदूना आवाहन आहे की जोपर्यंत भोंगे उतरवले जाणार नाहीत तोपर्यंत हनुमान चालिसा दुप्पट आवाजात सुरु ठेवा. माणुसकीपेक्षा हे लोक त्यांचा धर्म मोठा समजतात का?", असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.


"माझा विषय हा सकाळच्या अजानपुरता विषय नाही. आम्ही दिवसभर चार ते पाच वेळा वाजवण्यात येणाऱ्या अजानविरोधात आहोत. आम्हाला कोणत्याला सणाला एका दिवसाची किंवा ठराविक दिवासांची परवानगी देता, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणं त्यांनीही दररोज परवानगी मागितली पाहिजे. अनधिकृत भोंगे उतरवले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. जोपर्यंत हा विषय संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्या मर्यादेत अजान होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरु राहणार आहे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.