वानखेडे आरोपीच्या पिंजऱ्यात, नवाब मलिकांनी झोडपलं!

 “समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून एका गरीब अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली आहे. त्यांचा जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र खोटं निघालं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला,असा गंभीर आरोप करत त्याच न्यायाने 15 कोटी मुस्लिमांना अशी नोकरी मिळेल काय?”, असा खडा सवाल ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

वानखेडे आरोपीच्या पिंजऱ्यात, नवाब मलिकांनी झोडपलं!


आज सकाळी 10 वाजता मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांच्याविरोधात तीन बॉम्ब फोडले. ड्रग्जप्रकरणात एनसीबीने क्रूजवर धाड टाकलीच नाही, त्या क्रूजवर समीर वानखेडे यांचा दाढीवाला मित्र होता, जो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे तसंच वानखेडे यांनी खोटी कागदपत्रे करुन नोकरी मिळवली, या प्रकरणी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केलीय.


तर 15 कोटी मुस्लिमांना अशी नोकरी मिळेल काय?

जर जात प्रमाणपत्रानुसार अल्पसंख्याक समीरला असा फर्जीवाडा करुन नोकरी मिळत असेल तर 15 कोटी मुस्लिमांना मागासवर्गीय म्हणून अशी नोकरी मिळेल का?, असा खडा सवाल विचारत मी दाखवलेला त्यांचा जात प्रमाणपत्राचा दाखला जर खोटा असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

“कागदपत्राविरोधात छेडछाड करुन तथा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की वानखेडेची नोकरी नक्की जाईल. आता जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.


नवाब मलिक नेमकं काय म्हटले?

“माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला देऊन त्यांनी नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एका अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली. गरिब वंचित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.”