कहाणी सीताफळाची - ताई कितीला देताय ही पाटी? - ✍️संदिपान कोकाटे

 


 

ठिकाण:- #मांजरसुंबाघाट 

                          ता. जि. बीड (मराठवाडा)

ताई कितीला देताय ही पाटी??"

" भाऊ ही ३०० आणि ह्या दोन पाट्या २५० रुपायाला"

त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला.. 

"दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय...??" 

" भाऊ चवीला, संख्येत सारखेच आहे फरक फक्त लहान मोठ्या सीताफळात असतो म्हणून." 

मी दोन्ही पाट्याकडे बघत होतो. अगदी बराच वेळ......

त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते. एखाद्याने मोठ्या श्रमाने पायात मोडणारे काटे सहन करुन चवदार सीताफळे गोळा केली आहेत, आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन... नावे ठेवून निघून जावे...  काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला.  


" भाऊ दहाविस कमी द्या, एवढे काय पहायले" 

"अहो ताई मी किंमत कमी नाही करनार.." 

त्या रखुमाईला वाटले, मी किंमत कमी करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो की काय.  शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही, असा तिचा समज झाला असेल..

परत ती म्हणाली, "भाऊ म्या स्वता गोळा केलेली सीताफळं हाइत. एक बी खराब नाही." माझ्यावर लई उपकार हुतील.."  "सगळी सिताफळ लई चवदार हाईत.."


"अहो मी त्या सिताफळाकडे नाही बघत. ते चवदार असणारच आहेत. मी बघत आहे तुम्हाला लागलेल्या पायाच्या बोटाला."  धनगरवाडी ता. बीड येथील असलेल्या त्या ताईच्या पायाला खूप लागले होते. त्यावर पट्टी बांधलेली होती. त्या झालेल्या जखमेच्या वेदना होत असतील, असे त्याच्या शरीराच्या हालचाली वरून दिसत होते.

 "भाऊ मी स्वतः डोंगर दर्यात फिरून गोळा केली हाइत ही सीताफळ.." अन् ही गोळा करताना पायाला खूप लागलं हो भाऊ.."

"ह्या पोटाची खळगी भरण्यासाठी काट्या-कुपाट्याचा इचार करून नाही जमत भाऊ."


 


" भाऊ घेताना मग..? " 

" हो ताई " 

तिच्या चेहऱ्यावर हस्य उमलले. 

"हे घ्या ३०० रुपये"  

भाव न करता सीताफळे घेवून मी, दत्ता लहाने , व  अनंत उद्धवराव पाटील निघालो आणि ती तिचा पसारा आवरायला लागली .. घरी जाण्यासाठी..


    मी विचार करत होतो. कुठल्यातरी डोंगराळ भागातुन डोक्यावर पाट्या आना. मग त्या घेवून  पाच दहा किमी लांब असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी डोंगर दऱ्या चडून त्या घेवून जावा . 

एवढ्या बेजारीतुन त्या सीताफळाची किंमत किती तर २०० ते ३००

 रुपये.. 

अन् मॉलमधल्या सीताफळाची किंमत किती..?? तर चक्क १५० रुपये किलो पासून पुढेच ... 


अशा ठिकाणी भाव न कमी करता तुम्ही सुद्धा एखाद्याच्या श्रमाचे मुल्य करु शकतात ... 


फार सोपी कृती आहे. करुन बघा. 

थेट शेतात पिकवलेले माळवं भाजीपाला घेवून आलेले शेतकरी पहाटेच रोडच्या कडेला बसतात. भाव न करता घ्या बर .. काय बिघडत नाय.. 


उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज घेवून बसलेले कुंभार... हंडा घेताना भाव कमी करु नका,  काय बिघडत नाय .. 


लोहाराकडुन विळा, कुऱ्हाड शेवटुन घेताना .. कुलपाची नवी चावी बनवुन घेताना भाव कमी करु नका काय बिघडत नाही ..


भाव कमी करायचा प्रयत्न मॉलमध्येकरुन बघा बरे .. 


दोन रु सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट का घेतो आपण .. त्याला ते दोन रुपयेच दे म्हणावे .. 

वाटलेच तर घेतलेले सामान वापस करा ..

दुसरीकडे घ्या ..

पण हस्तश्रमाने राबनार्यांच्या श्रमाचे मोल करा ..


✍️संदिपान नामदेवराव कोकाटे

रा. निपाणी ता. भूम

मो. 9421445159